श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : जन्म – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

या गोष्टीला खूप म्हणजे खूपच वर्षं झाली. पण काही वेळा स्मृतीच्या तळातून ती अचानक वर उसळून येते. १९६७ सालची गोष्ट. त्या वर्षी मी बी.एड. करत होते.फेबु्रवारी महिना. आमचा फायनल लेसन प्लॅन लागला होता. परीक्षेच्या वेळी पहिल्या दिवशी पहिलाच माझा मराठीचा लेसन होता. युनीट कोणत घ्यावं, कसा लेसन घ्यावा इ. विचार स्वाभाविकपणेच मनात घोळत होते. लेसनसाठी पाठ्य पुस्तकातील कविता निवडावी, की बाहेरची? असं सगळं विचार मंथन चालू होतं. त्यातच माझी मासिक पाळी सुरू झाली. यावेळी चार-पाच दिवस उशीर झाला होता. तरी पाठपरीक्षेपूर्वी ३-४ दिवस सहज सगळं निपटलं असतं. पण यावेळी नेहमीप्रमाणे चार-पाच दिवसानंतरही ब्लिडींग थांबेना. मग मात्र धाब दणाणलं. पाठ परीक्षा हातची गेलीच बहुतेक, असं म्हणत डॉक्टरांकडे गेले.

डॉ. श्रीनिवास वाटवे हे त्या वेळचे नावाजलेले गायनॅकॉलॉजीस्ट. त्यांना दाखवले. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी `क्युरेटिन’चा सल्ला दिला. संध्याकाळी अ‍ॅडमिट झाले. रात्री सात-साडे सातला क्युरेटीन होणार होते. त्याप्रमाणे मला प्रिपेअर करून टेबलवर घेतले. तिथे भिंतीला लागून असलेल्या शो-केसमध्ये सर्जरीची साधने होती. वेगवेगळ्या आकाराच्या सुर्‍या, कात्र्या, चाकू , सुया, पकडी आणखी किती तरी. लखलखित. चकचकित.

अ‍ॅनॅस्थेशिया देणारे डाक्टर अद्याप यायचे होते. त्यामुळे डॉक्टर, सहाय्यक, नर्सेस सगळी मंडळी डॉक्टरांची वाट बाहेर उभे होते. रूममध्ये टेबलावर फक्त मी आणि भोवतीनं शो-केसमधली लखलखित साधने. हत्यारे.

मी मनाशी पाठाबद्दलचा विचार करायचे ठरवत होते. कशी सुरुवात करायची्… कोणते प्रश्न विचारायचे? वगैरे… वगैरे… पण त्यातलं काही डोक्यात येतच नव्हतं. भरकटलेल्या विचारांना शब्द मिळत गेले-

 

घटका भरत आलेली

जीवघेणी कळ

मस्तक भेदून गेलेली

ललाटीची रेषा,

वाट हरवून बसलेली

घड्याळाची टिक टिक

जिण्याचा तोल साधत

सांडत असलेली

 

इतक्यात डॉक्टर आले. मला भूल दिली गेली. डॉक्टरांनी आपलं काम पूर्ण केलं.

काही वेळाने माझी भूल उतरली. भूल उतरता उतरताही मगाच्याच ओळी मनावर उमटत राहिल्या. त्या पुसून मी पुन्हा पाठाचा विचार करू लागले. पण तो विचार मनातून हद्दपारच झाला. त्याच्याच पुढच्या ओळी प्रगटत राहिल्या.

 

इथरची बाधा

नसानसातून शरीरभर भिनलेली…

लाल… हिरवी… पिवळी… निळी वर्तुळं

काळवंडत गेलेली…

पांढर्‍या शुभ्र ठिपक्यांच्या

लयबद्ध हालचाली.

पाजळत्या रक्तपिपासू हत्यारांची

लांबच लांब पसरलेली

अशुभ सावली.

संज्ञा बधीर होताना

सारं सारं दूर सरतय.

रक्तात उमलणार्‍या

गुलबकावलीचं हसू,

लाटालाटांनी मनभर उसळतय.

अणूरेणू व्यापून उरतय.

 

इथे माझ्या नेणिवेने क्युरेटिनचं `सिझेरियन केलं होतं आणि कल्पनेनं गुलबकावलीचं फूल माझ्या ओंजळीत ठेवलं होतं. माझ्या `जन्म’ या कवितेचा जन्म अशा रीतीने तिथे ऑपरेशन टेबलवर झाला.

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments