सुश्री मंजिरी येडूरकर
क्षण सृजनाचे
☆ शकुनी, एक धगधगता सूडाग्नी ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
काळ्या कभिन्न सावल्यात तारूण्याचा मळा
अन् तुटलेल्या काळजात अजरामर कळा
देहच काय, सगळंच होऊन पडलं गलितगात्र
अन् जरा बनलं एक विदुषकाचं पात्र
काय चुकलं माझं? नसानसात घृणा पेटलेली
जळणाऱ्या डोळ्यांनी, युगायुगाची आग ओकलेली
निधड्या छातीनं भर सभेत लाज ओरबाडली
षंढांच्या बाजारात गोळा केली आसवं गाळलेली
माझा विडा कुणी उचलावा? सावलीत खुडलेलं कर्तृत्व
निवडुंगाच्या उलट्या काट्यांनी पोखरलेलं स्वत्व
गंजलेली शस्त्रं अन् झाकोळलेलं आयुष्य, भितीनं!
कुणाच्या बाहुच्या, कुणाच्या बाणाच्या तर कुणाच्या नितीनं!
बापानं आपलाच भेजा भरवला बाळवाटीनं!
भूत अन् भविष्य ढकलत राहिला जळत्या काडीनं
कुरवाळायचं कुठल्या आगीला अन् ठेचायचं कुठल्या आगीला
हे ठरवणार कोण? यांच्या कुलस्त्रिया अन् लंपट बासरीवाला!
मी कधीच हरलो नाही अन् हरणार ही नाही
मी कधीच चुकलो नाही अन् चुकलेल्यांना माफही करणार नाही
माझ्या या अवस्थेस कारणीभूत, ही मूर्ख कौरव प्रजा
हा सूड घेण्यात झालो यशस्वी, नष्ट झाला अंध राजा
अजूनही कित्येक सूड आहेत शिल्लक धगधगते
सत् शील, सत् कर्म, सत् वचन यांच्या बुरख्यात होते
युगानुयुगे मी जन्म घेत राहीन, हा सुडाग्नी पेटता राहील
खरे सत्य युग येईल, तेंव्हाच हा आत्मा शांत होईल!
कवितेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी शकूनीची कथा, त्याच्याच शब्दात! –
काळ कोठडीतला तो एक एक दिवस अजून पोखरतोय. आई, वडील – सुबल ( गांधार देशाचा राजा),सगळी भावंडं यांना भुकेनं तडफडून मरताना पाहिलंय मी! काय गुन्हा होता आमचा? केवळ गांधारीच्या पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी केलेला तो एक उपाय होता. तो ही राजा ध्रुतराष्ट्राच्या दीर्घायुष्यासाठी!आणि उगाच विधवेशी लग्न लावून दिलं, असा कांगावा केला. त्यात आमचा काही स्वार्थ होता का? अशी ती कोणती कौतुकास्पद, अभिमानास्पद गोष्ट होती की ती सर्वांना आवर्जून सांगावी. असेलही ती आमची चूक, तुम्हाला न सांगण्याची! पण ती तुमच्या चुकीपेक्षा तर मोठी नव्हती.चूक कसली, फसवणूक होती ती आमची, सत्तेच्या बळावर, स्वार्थासाठी केलेली!
भीष्म पितामह गांधारीचा हात मागण्यासाठी आले होते. त्यांना माहीत होतं, आम्हाला नाही म्हणता येणार नाही, इतकं त्या सोयरिकेला राजकीय महत्त्व होतं. आणि होय म्हणणं पण अवघड होतं. शंकर आराध्य असणाऱ्या त्याचा आशीर्वाद असणाऱ्या एका सुंदर राजकुमारी ने एका अंध राजाशी लग्न का करावं? शेवटपर्यंत राजा गांधारीला विचारत होता, नाही म्हणू या का ? वडिलांची द्विधा मनस्थिती लक्षात घेऊन गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली व प्रतिज्ञा केली की ही पट्टी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच राहील. आणि म्हणाली आता तुमच्या मुलीला योग्य वर मिळाला आहे नं! लग्न झालं, नंतर आम्हा सर्वांना काळ कोठडीत टाकून गांधार राज्य काबीज केलं.
एक बरं केलं, आम्हाला पोटभर अन्न दिलं नाही. त्यामुळे सगळे लवकर गेले, यातनातून मुक्त झाले. पण त्यांनी मला जगवलं. नुसतं जगवलं नाही तर माझ्या मनात सुडाग्नी धगधगत ठेवला. मी षडयंत्र रचण्यात पटाईत होतो. वडिलांनी मला द्युत खेळण्यास शिकविले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मनावर दगड ठेवून मी त्यांच्या हाडांचे फासे केले, जे माझ्या आज्ञेत राहणार होते. किती क्रोध, किती मत्सर, किती जळफळाट माझ्या मनात कोंडला असेल याची कोणी कल्पनाच करू शकणार नाही. माझं नशीब बलवत्तर म्हणून मी एकटा उरल्यावर माझी सुटका केली व चक्क राजमहालात प्रवेश दिला. खोटा अहंकार, फाजील आत्मविश्वास, सत्तेचा माज यामुळे त्यांना वाटलं असेल की हा आपलं काय वाकडं करू शकणार! ही गुर्मी माझ्या पथ्यावर पडली आणि मी या संधीचं सोनं करायचं ठरवलं. मी शांत राहून प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांचा विश्वास संपादन केला. नको इतकं त्यांना पांडवांच्या विरूध्द भडकवित राहिलो. द्यूत हा माझा हुकुमाचा एक्का वापरला. पांडवांची मानहानी करून कौरवांच्या मनात आणि महालात स्थान पक्कं केलं.
युधिष्ठिर सद्गुणी, सत्यप्रिय इत्यादी गुणांचा पुतळा असल्यामुळे त्याच्यावर कुरघोड्या करणं सोपं होतं.इतर पांडव कसेही असले तरी मोठ्या भावाच्या आज्ञेत होते.
कुंती माता तिच्या तीनही मुलांना घेऊन वनातून हस्तिनापूरला आली, त्यांना युध्दाचं शिक्षण देण्यासाठी!तिकडे माद्रीला अश्विनी कुमार यांच्या पासून दोन मुलगे झाले.ते दोघेही वैद्यक शास्त्रात निपुण झाले. जसं मोठ्या झाडाच्या छायेत लहान झाडं खुरटतात, तसं थोडं त्यांचं झालं. सहदेवला त्रिकाल ज्ञानी होण्यासाठी पंडू राजाने अंत्य समयी आपल्या मेंदूचा काही भाग खाण्यास सांगितले. त्याला भविष्याचे ज्ञान झाले, त्यामुळेच द्युत खेळण्यासाठी सगळे निघाले तेंव्हा त्यांना अडविण्याचा आटोकाट प्रयत्न सहदेव ने केला, निदान द्रौपदीला नेऊ नका म्हणाला, त्याच्या म्हणण्याला महत्त्व कोण देणार? विधिलिखित कुणालाच पुसता येत नाही, ते सहदेवला कसं येणार! दैव माझ्या बाजूने होते कारण माझीही बाजू सत्याचीच होती.
कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला. पण मी निर्धास्त होतो कारण मला माहित होतं की द्रौपदीला वस्त्र पुरविणारा कृष्ण काहीही करू शकतो. पांडव मेले असते तर कौरव मदोन्मत्त झाले असते, मग माझ्या सुडाचं काय? अखेरीस सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत गेल्या आणि कौरव – पांडव यांच्यात निर्णायक महाभारत सुरू झालं. अर्थात माझ्याबाबतीत सुध्दा विश्वासघात झालाच.दोघांच्या जवळचे बाण संपल्यावर रथावरून उतरून सहदेव बोलणी करण्यासाठी आला म्हणून मी ही रथावरून उतरून आलो तेंव्हा त्याने मला बेसावध पाहून तलवारीने घाव घातला. मृत्यूचं दुःख नव्हतंच. कारण तो युध्दाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे एकन् एक कौरव मारला गेला हे माझ्या डोळ्यांनी पाहून मी तृप्त झालो होतो. माझा जगण्याचा उद्देश्य सफल झाला होता. या युद्धात पांडव, यादव सगळेच भरडले गेले. त्यामुळे माझ्या आनंदात भर पडली होती. पांडव, कृष्ण यापैकी कोणाबद्दल ही मनात ओला कोपरा नव्हताच. कारण शक्य असूनही यांच्यापैकी कोणीही आम्हाला सोडवण्यास आले नव्हते. तो भीष्म आणि त्याचा हा सगळा पसारा उध्वस्त झालेला पहायचा होता. भले युद्धानंतर कुणी काय गमावलं, कुणी काय कमावलं यावर चर्चा होत राहतील, पण निष्कर्ष एवढाच असेल की फक्त मी हे युद्ध पूर्णपणे जिंकलो! फक्त मी जिंकलो!!!
गुगल वरील महाभारताच्या ‘न ऐकलेल्या गोष्टी ‘ यांच्यावर आधारित
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈