मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ समुद्र … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆
डॉ. निशिकांत श्रोत्री
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ समुद्र … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
समुद्राचे माझ्या लिखाणाशी विलक्षण घनिष्ठ नाते आहे. मला स्वतःला याची जाणीव गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘भेकड निसर्ग’ ही कविता प्रसवल्यावर झाली. मी भेट दिलेला एकही समुद्र किनारा असा नाही जेथे माझ्याकडून काही साहित्य निर्मिती झाली नाही. महाबलीपुरम् ला तर समुद्रात कमरेएवढ्या पाण्यात उभा असतांना उन्मनी अवस्थेत माझ्याकडून एकापाठोपाठ एक चार कवितांची निर्मिती झाली; त्या समुद्रातच पाठ करून नंतर मी चौघांच्या बसच्या तिकिटांच्या मागे लिहून काढल्या.
काही वर्षांपूर्वी जुहू येथे माझा मुलगा सुश्रुत याच्या घराच्या खिडकीतून समुद्राचे रौद्र स्वरूप पाहून माझ्याकडून ही कविता रचली गेलीः
☆ नकोस लंघु किनारा ☆ डाॅ. निशिकान्त श्रोत्री ☆
☆
भूचर सारे अपुल्या धामी नकोस दावु दरारा
रौद्रस्वरूपी लाटा उसळुनि नकोस लंघु किनारा ||धृ||
*
अथांग असशी अंतर्यामी तयात होई तृप्त
त्याच्याही गर्भातुन लाव्हा खदखदतो ना तप्त
भूपृष्ठाच्या साम्राज्याचा भव्य किती तो तोरा
रौद्रस्वरूपी लाटा उसळुन नकोस लंघु किनारा ||१||
*
मर्यादेच्या परीघामध्ये जग सारे गोजिरे
अपुल्या अपुल्या विश्वामध्ये रूप भासते न्यारे
भूमी परकी, नको तयावर आक्रमणाचा तोरा
रौद्रस्वरूपी लाटा उसळुन नकोस लंघु किनारा ||२||
*
जलचर सारे तुझिया पोटी नको अतिची आंस
भूचर अपुले सुखरूप असती तुझा न त्यांना ध्यास
मेघ होउनी नभातुनिया भूवरी वर्षी धारा
रौद्रस्वरूपी लाटा उसळुन नकोस लंघु किनारा ||३||
*
रत्नाकर तू तुझिया पोटी अमोल खजिना लक्ष्मीचा
भूसृष्टीची हांव नसावी सुशांत होई साचा
तुझाच ठेवा तुझ्याचपाशी जपून ठेवि सागरा
रौद्रस्वरूपी लाटा उसळुन नकोस लंघु किनारा ||४||
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈