श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ क्षण सृजनाचा – एक नवा अंकुर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆ कविता — एक नवा अंकूर ☆
☆
उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर
*
नसेल तेथे हिरवी भूमी
नसेल जिरले कधीही पाणी
घाम गाळिता पिकतील मोती
ध्यास हाच मनी, लाभ यशाचा असो कितीही दूर
उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर १
*
रखरखणा-या उन्हात न्हाऊ
श्रमदेवीची गीते गाऊ
भाग्य आपुले आपण उजळू
भीति कशाला मग कष्टाची घामाचा वाहो पूर २
*
भगीरथाचे वंशज आपण
गगनालाही घालू गवसण
अशक्य ते ही करुया आपण
चैतन्याने उजळून जाता, अंधाराचा फाटे ऊर ३
*
स्फुरोत आता बाहू तुमचे
तुम्हीच त्राते नव्या जगाचे
भविष्य भीषण पहा हासते
वेध घेऊया त्याचा आपण गतकालाला सारून दूर
उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर ४
☆
एका बॅन्केच्या ग्रामीण शाखेत नुकतीच नोकरी लागलेली. नामांकित बॅन्केत नोकरी मिळाल्यामुळे मनापासून आनंद झालेला. त्यामुळे नवीन शिकावे, यश मिळवावे ही इच्छा आपोआपच मनात जागृत झालेली. अशातच त्या ग्रामीण शाखेतून दुस-या एका ग्रामीण शाखेत काही महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती झालेली. तिथे जाणे येणे सुरु झाले. या संपूर्ण प्रवासात शहरी भाग फारच थोडा होता. बराचसा भाग हा कोरडवाहू किंवा दुष्काळी म्हणावा असाच होता. जाताना खूप लहान लहान खेडी लागत होती. अशा खेड्यातही आमच्या बॅन्केची शाखा दिसत होती. हा सगळा अनुभव नवीन होता. प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाशी सामना करुन उभा असणारा शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असणारी आपली बॅन्क पाहून उर अभिमानाने भरुन यायचा. स्वतःचे भविष्य स्वतःच घडवायचे असते या विचाराचे स्मरण व्हायचे. कष्टातून नंदनवन उभे राहते. घाम गाळणा-याला यश मिळणारच. अशा सकारात्मक विचारांनी मन भरुन गेले आणि शब्द सुचत गेले… ‘ उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर ‘….
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈