डॉ. निशिकांत श्रोत्री
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ ज्ञानसविता… … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
‘ ज्ञानसविता ‘ म्हणावी अशी विलक्षण बुद्धिमान, कर्तबगार आणि कार्यसमर्पित असणारी माझी पत्नी डॉ. सौ. अपर्णा श्रोत्री हिचे १० डिसेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले. आता केवळ तिच्या असंख्य आठवणी मनात अविरत रुंजी घालत राहिल्या आहेत. अपर्णाने आपले सारे आयुष्य मातृत्वाच्या सेवेच्या संवर्धनात आणि आपल्या शिष्यांना तरबेज आणि निपुण करण्यात वेचले. तिच्या त्या अविरत कार्यापुढे आज पुन्हा एकदा नतमस्तक होतांना मला अगदी माझ्याही नकळत सुचलेली ही कविता — जणू मी मनःपूर्वक तिला वाहिलेली श्रद्धांजलीच – –
☆ ज्ञानसविता… … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली
उजळूनी साऱ्या विश्वाला कर्मप्रभा शाश्वत झाली ||धृ||
*
देवि सरस्वति खिन्न जाहली ज्ञानकोशही स्तब्ध जाहला
मातृत्वाचा विरस जाहला धन्वंतरीही सुन्न जाहला
यमपाशाचा वेध निष्ठुर देवी शारदा निष्प्रभ झाली
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||१||
*
गुरुस्थानी ती शिष्यगणांच्या सकलांची माता होती
ज्ञान देऊनी कुशल बनविले मातृत्वाची सेवक होती
सक्षम केले लक्ष करांना मातृसेवा बळकट केली
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||२||
*
ज्ञान अर्पिले प्रेम वर्षले वात्सल्याची माता ती
कवच होऊनी निरामयाचे मातृत्वाची रक्षक ती
वसा घेउनीया सेवेचा मातांच्या अजरामर झाली
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||३||
*
धनसंपत्ती कीर्ति प्रतिष्ठा मनात नव्हती अभिलाषा
गर्भवतींचे रक्षण करणे जीवनात घेतला वसा
शिष्यगणांना निपुण करुनीया कर्मसिद्ध जाहली
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||४||
*
समाजसेवा अंगिकारली कुटुंब अपुले विश्व जाणुनी
जोखीम भरल्या मातांसाठी कवच जाहली झणी धावोनी
विद्ध होउनी मृत्यूने मातांच्या कार्या सिध्द जाहली
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||५||
*
अंतर्यामी अखंड अविरत सुरक्षीत प्रसूतीचा ध्यास
सुदृढ शिशु जन्माला यावे सदैव जागृत होती आंस
साध्य कराया पावन ध्येया बहुत ग्रंथ संपदा लिहिली
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||६||
*
अजातशत्रू जीवनात या विश्वाची ती सखी जाहली
जन्म देऊनी दोन बालका लाखोंची आई झाली
पत्नी होऊन एक क्षणाची कालातीत माता झाली
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||७||
*
निरोप अपुला तृप्त मनाने घेउन निजधामा गेली
समाधान तिज आत्म्याला कर्तव्याची बूज राखली
आपपराचा भाव कधीही मनी ठेवुनी ना जगली
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||८||
*
कर्मापासुनिया निवृत्ती अंतर्यामी तृप्त होऊनी
झेप घेतली ब्रह्म्यालागी निजदेहाला अंतरली
सद्गती लाभो तुला अपर्णा दिव्य प्रार्थना आळविली
आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||९||
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈