श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ क्षण सृजनाचे : तहान ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मी डी.एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा आशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.
तिथे असलेल्या मदतनीस बाई आम्हाला क्रेशची माहिती सांगत होत्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्यांची मुले तिथे येत. त्या बोलत असतानाच तिथे एक दीड – पावणे दोन वर्षाची, नुकतीचा चालायला लागलेली मुलगी लडखडत आली आणि खाली बसून त्या मदतनीस बाईंच्या पायाला तिने मिठी मारली. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतले. मग म्हणाल्या, ‘क्रेशने अॅडॉप्ट केलेली ही पहिली मुलगी. एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याची ही मुलगी. नन मारियाच्या मनात ही मुलगी भरली. त्यांनी त्या भिकारी दांपत्याला संगितले, की आम्ही तुमच्या मुलीला सांभाळू. तिला खूप शिकवू. तिला चांगलं जीवन जगायला मिळेल. पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला आपली ओळख आजिबात द्यायची नाही. बघा. तिचं कल्याण होईल. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. थोडं एकमेकांशी बोलले. त्यांना वाटलं असणार, निदान मुलीला तरी आपल्यासारखी भीक मागत जगायला नको. त्यांनी नन मारियाची अट मान्य केली. आम्ही हिला खूप शिकवणार आहोत. डॉक्टर करणार आहोत आणि पुढे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवणार आहोत.’ एव्हाना त्यांनी त्या मुलीला आपल्या दुसर्या मैत्रिणीकडे सोपवले होते आणि त्या पुढे माहिती सांगू लागल्या. पण माझं तिकडे लक्षच नव्हतं.
माझं मन त्यावेळी ती लहान मुलगी, तिचे लेप्रसी झालेले आई-वडील, त्या मुलीला डॉक्टर करून जर्मनीला पाठवायचे क्रेशच्या लोक बघत असलेले स्वप्न यातच गुंतून गेले होते.
त्यांची माहिती सांगून झाली होती. आम्ही कॉलेजमधे परत आलो. घटना घडली, ती एवढीच. पण माझ्या डोक्यातून ती मुलगी काही जाईना. बघता बघता डोक्यात एक कथा आकार घेऊ लागली. रात्री सगळं आवरलं, पण मला काही झोप लागली नाही. मग मे उठले. कागद पुढे ओढले आणि लिहायला बसले.
मी त्या मुलीचं नाव ठेवलं जस्मिन. आणि क्रेशचं नाव ठेवलं ‘करुणा निकेतन क्रेश’. हे क्रेश म्हणजे, शहरातील दरिद्री, मागास वस्ती असलेल्या भागातील ‘ग्रीन टेंपल चर्च’ची सिस्टर इंस्टिट्यूट. चर्चचे बिशप फादर फिलिप जर्मनीहून आले होते. त्यांच्या सोबत आल्या होत्या सिस्टर नॅन्सी, सिस्टर ज्युथिका, सिस्टर मारीया. हे सारेच जण ‘दीन-दुबळ्यांची सेवा ही प्रभू येशूची सेवा’, या श्रद्धेने काम करत होती. थोड्याच काळात क्रेशचा नावलौकिक वाढला. आता इथे ३५० च्या वर मुली आहेत. त्या वेगवेगळ्या वयाचा वेगवेगळ्या इयत्तेतल्या आहेत. कुणी तिथेच रहाणार्या आहेत. कुणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबून संध्याकाळी घरी जाणार्या आहेत. स्थानिक लोकांनीही मदत केलीय, अशी पार्श्वभूमी मी तयार केली.
कथेची सुरुवात मी जस्मिन डॉक्टर झालीय आणि जर्मनीला उच्च शिक्षणासाठी निघालीय. क्रेशच्या रिक्रिएशन हॉलमध्ये तिचा निरोप समारंभ झालाय. सर्वांनी तिला तिच्या कार्यात यश लाभावे, म्हणून प्रभू येशूची प्रार्थना केलीय आणि तिला शुभेच्छा दिल्यात.
ती जर्मनीला लेप्रसीवर विशेष संशोधन करणार आहे आणि आल्यावर लेप्रसी झालेल्यांसाठी क्रेश सुरू करणार आहे. आता ती पायर्या उतरतेय. तिच्या मागे क्रेशचे लोक, मुली तिला निरोप देण्यासाठी गेटपर्यंत आल्या आहेत. गेटशी आल्यावर तिचे लक्ष नेहमीप्रमाणे महारोगी असलेल्या भिकार्यांकडे जाते आणि ती मनातल्या मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला आशीर्वाद द्या. मला माझे स्वप्न पुरे करता येऊ दे. माझे ध्येय साध्य करता येऊ दे, अशी प्रभूपाशी प्रार्थना करा.’
मी पुढे लिहिलं, क्रेशमध्ये अगदी लहानपणी आलेली जस्मिन हळू हळू मोठी होऊ लागली. तशी इतरांच्या बोलण्यातून तिला आपली जीवन कहाणी तुकड्या तुकड्याने कळली. आपण लेप्रसी झालेल्या भिकार्याची मुलगी आहोत, हे तिला कळलं. मग त्यांच्याकडे बघायचा तिला नादच लागला. कोण बरं असतील यातले आपले आई-वडील. तिला कुणाचा नाक आपल्यासारखं वाटे, कुणाची हनुवटी, तर कुणाचे कपाळ. कोण असतील यातले आपले आई-वडील? ती पुन्हा पुन्हा विचार करी. ती आपल्याकडे बघते आहे, हे पाहून भिकारी आपली थाळी, वाडगा वाजवत भीक मागत. म्हणत, ‘एक रुपया दे. देव तुला श्रीमंत करेल.’ तिला हसू येई, आपण त्यांना पैस दिल्यावर, जर देव तिला श्रीमंत करणार असेल, तर तो डायरेक्ट त्यांनाच का पैसे देणार नाही? अर्थात तिला कितीही द्यावेसे वाटले, तरी तिच्याकडे पैसे नसत. तिच्या सगळ्या गरजा क्रेश भागवत असल्यामुळे तिच्याकडे पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता.
जस्मिन कथेची नायिका. तिचं व्यक्तिमत्व उठावदार, आकर्षक असायला हवं. मी दाखवलं, की ती प्रेमळ, मनमिळाऊ आहे. इतरांना मदत करायाला ती नेहमीच तत्पर असते. प्रभू येशूवर तिची अपार श्रद्धा आहे. त्याच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. नाताळ आणि इस्टरच्या वेळी चर्चच्या समोर बसलेल्या भिकार्यांना मिठाई, केक वगैरे वाटले जायचे. जस्मिन या कामात नेहमीच पुढाकार घेई.
अनेकदा जस्मिनच्या मनात विचार येई, आपण सिस्टर मारीयाच्या नजरेस पडलो नसतो आणि आपल्याला अॅडॉप्ट करण्याचा त्यांच्या मनात आलं नसतं किंवा आपल्या आई-वडलांनी त्यांची अट मान्य केली नसती, तर आपलं आयुष्य कसं घडलं असतं? या समोरच्या भिकार्यांमध्ये आणखी एकाची भर पडली असती. मग तिच्या अंगाचा थरकाप होई.
आज मात्र येशूच्या, चर्चच्या आणि क्रेशच्या कृपेमुळे ती डॉक्टर झालीय आणि उच्च शिक्षणासाठी आणि लेप्रसीवरील संशोधनासाठी जर्मनीला चाललीय. तिचा निरोप समारंभ झाला, तिथे तिच्या समोरच्या भिंतीवर एक भलं मोठा पोस्टर लावलेलं आहे. त्यात एक मध्यमवयीन स्त्री रेखाटली आहे. तिने हाताची ओंजळ केली आहे. आणि येशू त्यात वरून पाणी घालत आहे. खाली लिहिलं आहे, ‘त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागावतो, त्याला पुन्हा तहान लागत नाही.’
हे पोस्टर मी मिरज मिशन हॉस्पिटलच्या दारातून आत गेल्याबरोबर दिसेल असं दर्शनी भिंतीवर लावलेलं पाहिलं होतं. ते तिथून आणून, मी या कथेत रिक्रिएशन हॉलच्या भिंतीवर लावलं. जस्मिनचं लक्ष वारंवार त्या पोस्टरकडे जातय. तिला फादर फिलीपचं सर्मन आठवतं. कुणा शरमोणी स्त्रीची कथा त्यांनी सांगितली होती. त्या पापी स्त्रीला प्रभू येशूंनी दर्शन दिलं. तिला क्षमा केली. तिला जीवंत पाणी प्यायला दिलं. आध्यात्मिक पाणी. त्या प्रसंगावर ते पोस्टर आहे. तिची तहान कायमची भागली, असं पुढे कथा सांगते.
स्मिनला वाटतं, आपण तर प्रभू येशूने दिलेल्या पाण्यातच आकंठ डुंबत असतो. फादरनी आपल्याला या पाण्याजवळ आणलं. पण तरीही आपल्याला तहान लागलीय. आपल्या न पाहिलेल्या आई- वडलांना पाहण्याची तहान. खूप तहान…. घसा कोरडा पडलाय. जीव घाबरलाय, एवढी तहान . ..
क्रेशच्या बाहेर पडताना जस्मिनच्या मनावर या सार्या विचारांची गडद छाया आहे. टॅक्सीजवळ उभी राहून सुनीता तिला लवकर येण्यासाठी खुणावते आहे. ती जस्मिनला विमानताळावर पोचवायला निघलीय. जस्मिन टॅक्सीत बसते. मग तिला पुन्हा काय वाटतं, कुणास ठाऊक? ती दरवाजा उघडून बाहेर येते. आज तिच्या पर्समध्ये पैसे आहेत. ती भिकार्यांच्या थाळ्यात, वाडग्यात पैसे टाकते. मनात म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला माझ्या कार्यात यशयावे, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. मला आशीर्वाद द्या.’
जस्मिन टॅक्सीत बसते. टॅक्सी सुरू होते. चार विझू विझू झालेले क्षीण डोळे टॅक्सी गेलेल्या दिशेकडे असहाय्यपणे पहात रहातात.
इथे मी कथेचा शेवट केलाय.
कधी कधी मनात येतं, या दिवशी आम्ही त्या क्रेशला भेट दिली नसती, तर ही अशी कथा माझ्याकडून लिहून झालीच नसती
© सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈