श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : कथा या कवितेचा जन्म ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

1980च्या सुमाराची गोष्ट. मी त्यावेळी सांगलीयेथील क. ज्युनि, कॉलेज येथे अध्यापन करत होते. सकाळी सव्वा अकराला घंटा होई. परिपाठ वगैरे होऊन साडे आकाराला अध्यापन सुरू होई. दुपारच्या सत्रात विद्यार्थिनींचा पाठाचा सराव होत असे. त्यांच्या पाठ-सरावासाठी नगरपालिकेच्या वागवेगळया शाळा घेतल्या जात. एका वर्गात 3-4 जणींचे पाठ असत. प्रत्येक वर्गावर एकेक अध्यापक पाठ निरीक्षणाचे काम करी  व नंतर पाठाबद्दल चर्चा होई.

नगर पालिकांच्या अनेक शाळांची स्थिती त्या काळात बरीच दयनीय होती. अनेक ठिकाणी वर्ग खोल्यात फरशीही नव्हती. शेणाने सारवलेली जमीन असे. विद्यार्थीच अधून मधून ती सारवत. वर्गांची निसर्गाशी खूप जवळीक होती. आशा शाळेत येणारी मुलेही आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरची, तळा-गाळातील म्हणता येईल अशीच होती.

त्या दिवशी अशाच एका शाळेत मी पाठ निरीक्षणाला गेले होते. खाली चार वर्ग आणि वरच्या मजल्यावर तीन वर्ग अशी ती शाळा होती. अरुंद जिना चढून वर गेलं की ओळीने तीन वर्ग आणि त्यांच्यापुढे व्हरांडा.

नेहमीप्रमाणे पाठाला सुरुवात झाली. शिकवणारी विद्यार्थिनी चांगलं शिकवत होती. मुलेही पाठात छान रमून गेली होती. इतक्यात अचानकच पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर वाढला. छपरातून, तसेच समोरच्या व्हरांड्यातून  पावसाचे थेंब आत येऊ लागले. मुले थोडीशी गडबडली. बडबडली. विस्कळीत झाली. पण पुन्हा नीट ऐकू लागली. हा तिच्या शिकवण्याचा प्रभाव होता. एरवी मुलांनी या निमित्त्याने खूप दंगा-आरडा-ओरडा केला असता. हे सगळं बघताना, अनुभवताना मला एकदम सुचलं,

असाच प्रसंग. वर्गात गुरुजी मुलांना एक गोष्ट सांगत आहेत. बाहेर पाऊस पडतोय, पण मुलांना त्याची जाणीवच नाही, इतकी मुले गोष्ट ऐकण्यात तल्लीन झाली आहेत.

एवढ्यात तास संपल्याची घंटा झाली आणि दुसरा पाठ सुरू झाला. त्यादिवशी शाळेतून बाहेर पडेपर्यंत मला ‘कथा ‘ ही कविता सुचली आणि घरी येताक्षणी मी ती लिहून काढली.

 

कथा –

मरगळल्या दिशा

गच्च भरलेलं आभाळ

आंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला

पिसाट वारा छ्प्पर फाडून आत आलेला.

फुटक्या कौलारातून  निथळणारं पाणी

उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर

उठवतय शहारा अंगावर.

पोरं टोरं

कळकट, मळकट

केस विस्कटलेली, शर्ट फाटलेली

बसली आहेत, निमूटपणे

कथा ऐकत

कुणा सुशील, सुंदर राजकान्येची

तिला पळवून नेणार्‍या

कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची

प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची.

आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी

चमचमणारी, झगमगणारी

प्रेमळ गुरुजी वाटतात, यक्षांचे राजे

वाटा दाखवणारे, वर देणारे

सारी मुलेच मग बनतात राजपुत्र

भरजरी पोशाख ल्यालेले, तलवार घेतलेले

आणि निघतात सोडवायला

त्या सुशील, सुंदर राजक्न्येला

आणि इतक्यात

शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून.

घंटेची आरोळी ठोकून,

टाकतो सारी कथाच विस्कटून  

टाकतो सारी कथाच विस्कटून. 

      

या कवितेला कविसंमेलनातही त्या काळात खूप दाद मिळाली होती.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments