श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ क्षण सृजनाचा ☆ आमची सामूहिक कविता ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

माझ्या भाच्याला शाळेत सैनिकांना पत्र लिहून पाठवायचे होते. त्या पत्रातून त्यांना उत्तेजन देण्यासाठी कविता लिहून हवी होती. माझ्या बहीणीचा तसा आम्हाला फोनवर मेसेज आला. आम्ही सर्वांनी तो वाचला.आणि आमच्या डोक्यात विचार सुरु झाला. कशी कविता लिहावी ते नीट सुचत नव्हते. आमच्या ग्रुपमध्ये मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही नेहमीच आमच्या कविता लिहून पाठवत असू.पण त्या दिवशी आम्हाला काही करून कविता सुचत नव्हती. तेव्हा वाट पाहून शेवटी माझ्या दुसऱ्या बहीणीने कविता लिहून पाठवली आणि मग ती वाचल्यावर सर्वांना सुच लागली. आम्ही त्या माझ्या बहीणीने लिहलेल्या पहिल्या तीन कडव्याना धरूनच पुढील कडवी लिहीली. आणि आमची सामुहिक कविता तयार झाली.  कशी ते पहा.

भारत भू च्या सीमेवरती

सदैव रक्षणा तत्पर असती

नाही विसावा ना विश्रांती

सलाम माझा त्या वीराप्रती।।१।।

आले ते घरदार सोडुनी

मायेचे ते पाश तोडूनी

देशसेवेचे व्रत घेऊनी

सलाम माझा त्या वीराप्रती।।२।।

आम्ही इथे सुखाने राहतो

मौजमजा अन् सणात रमतो

आम्हासाठी प्राण आर्पिती

सलाम माझा त्या वीराप्रती।।३।।

धन्य त्यांची देशभक्ती

स्वार्थापलीकडे जनहित साधती

तिरंग्यात ऐसे लपेटून जाती

सलाम माझा त्या वीराप्रती।।४।।

अलौकीक शौर्य छाती निधडी

देहाची करुनी कुरवंडी

राष्ट्रवेदीवर अर्पुनी जाती

सलाम माझा त्या वीराप्रती।।५।।

धेय्य एकच डोळ्यापुढती

शस्त्र सदा घेऊन हाती

अखंड ठेवू मात्रूभू जगती

सलाम माझा त्या वीराप्रती।।६।।

या कवितेत पहिली तीन कडवी सौ. स्मिता ठाकुरदेसाई,चौथ कडव तिची मुलगी कु. सायली, पाचव कडव माझा चुलतभाऊ श्री. अतुल नवरे,आणि सहाव कडव मी म्हणजे अनिता खाडीलकर. अशी सहा कडव्यांची कविता आम्ही चौघांनी लिहीली.

याशिवाय माझ्या चुलतबहीणीने

‘नाही स्वतःची चिंता

उभे सैनिक सीमेवर

देशाचे रक्षण करत

झेलीत गोळ्या छातीवर।।१।।

आहात तुम्ही म्हणून

जगतो आम्ही आरामात

न गुरफटता नात्यात

चिंता करता देशाची।।२।।

नाही जुमानत कधी

उन पाऊस वारा

तुमच्यामुळेच आहे आज

सुरक्षित भारत सारा।।३।।’

 सौ.अनुश्री जाहगीरदार. हिने लिहिली.

तर  माझ्या भाच्चीनं

‘देशरक्षणापुढे इतर सर्व गौण

ठेवूनिया त्यांच्या त्यागाची जाण

घेऊनीया भूमातेची आण

प्रयत्ने चुकवू त्यांचे ऋण…

ही चारोळी कु.सायली ठाकुरदेसाई. हिने लिहिली.

अशा प्रकारे कधीच कविता न लिहणाऱ्या माणसांनी कविता लिहल्या. आणि पत्र पुर्ण करून पाठवले.

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

मजेशीर पण यशस्वी प्रयोग.