सौ ज्योती विलास जोशी
☆ क्षण सृजनाचा ☆ थेंबाचे अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
पावसाळ्यात माझ्या घराच्या पागोळ्यांवरून पडणारे थेंब निरखणे हा माझा विरंगुळा ! समुद्राच्या लाटा पाहण्यात जसा वेळ जातो ना अगदी तसंच काहीसं…….पुन्हा पुन्हा तीच गोष्ट पण मनाला नव्याने जाणवणारी अशी…..
थेंबांचे निरीक्षण करता करता मी थेंबांच्या अस्तित्वा विषयी विचार करू लागले. माझ्या डोळ्यांना दिसतो तोवर त्याचं अस्तित्व का? मातीत विरे पर्यंतच त्याचं अस्तित्व का ?की माझ्या मनात हृदयात आठवणीत तो असेपर्यंत त्याचं अस्तित्व?…..
थेंब नंतर कुठे जातो? ओढ्यात, डोहात, नाल्यात, समुद्रात ,नदीत ,मातीत की पुन्हा ढगात ?
मला तो नानाविध रूपात, रंगाढंगात दिसतो. किमान माझ्या मनात तो आहे हे त्याचं अस्तित्व मी नाकारू शकत नाही.
ह्या त्याच्या नश्वर प्रवासाची कहाणी मी कविता स्वरूपात लिहिली .
थेंबाचं अस्तित्व
एकदा एक थेंब……
मातीवर पडला
मृदगंध आला
अन् श्वासात भरला
एकदा एक थेंब
फुलावर पडला
दवबिंदू झाला
अन् चमकू लागला
एकदा एक थेंब
डोहात पडला
मित्रांसोबत डुंबला
अन् न्हाऊन निघाला
एकदा एक थेंब
बीजाला बिलगला
बीज अंकुरले
भरून पावला
एकदा एक थेंब
अळवा वर पडला
अळवावरचे पाणी म्हणून
नाकारला गेला
एकदा एक थेंब
अग्नित पडला
वाफ होऊन
ढगात गेला
एकदा एक थेंब
गाला वर पडला
खळी होऊन
गोड हसला
एकदा एक थेंब
हातावर पडला
तीर्थ होऊन
पवित्र झाला
एकदा एक थेंब
चक्षूतून ओघळला
अश्रु होऊन
मुग्ध गहिवरला
एकदा एक थेंब
अमृत होऊन आला
मोहिनीच्या हातून
जीवनदायी ठरला
एकदा एक थेंब
समुद्राच्या फेसातून उठला
सूर्याच्या किरणांनी
सोनेरी झाला
एकदा एक थेंब
चातकाला मिळाला
तृषा त्याची भागवून
पुण्यवान ठरला
एकदा एक थेंब
नदीला भेटला
एकरूप होऊन तिच्याशी
सार्थकी लागला
एकदा एक थेंब
शिंपल्यात पडला
मोती होऊन
चमकत राहिला
एकदा एक थेंब
दुसऱ्या थेंबाला मिळाला
थेंबे थेंबे तळे साचले
पुढे त्याचा प्रवाह झाला
इटुकला थेंब
पिटुकलं अस्तित्व
थेंबा थेंबा ची एकजूट
करी संपन्नतेची लयलूट
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
9822553857
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
छाान कविता.थेंबाचे अस्थित्व खर तर क्षणभंगुर.पण या क्षणभंगुर अस्तित्वात देखील तो वेगळ्या रूपात अापले अस्तित्व काायमचे निर्माण करतो.