चित्रकाव्य
नाते असे…
श्री प्रमोद जोशी ☆
☆
एका आकाशाच्या खाली,
एक दुसरे आकाश !
रविबिंब वर तरी,
खाली चंद्राचा प्रकाश !
☆
माया सांडते वरून,
दीन वाटे गंगास्नान !
अंगावरून ओघळे,
ईश्वराचे वरदान !
☆
तीन पिढ्यांना जोडतो,
असा स्निग्ध भावसेतू !
एका काठावर आजी,
आणि दुजा काठ नातू !
☆
साय सांगा केव्हा येते?
दूध तापल्यावरती !
आजी केव्हा होता येते,
माया मुरल्यावरती !
☆
नदी आटते वाहून,
आजी नेहमी दुथडी !
दोन्ही फाटती शेवटी,
आजी आणखी गोधडी !
☆
दोघांच्याही सुरकुत्या,
त्यांना फक्त उब ठावी !
स्पर्श जणू चंदनच,
चंदनाला उटी लावी !
☆
नातू नाती होती तेव्हा,
येई आजीला मोहर !
आणि सासरीच येई,
तिचे नव्याने माहेर !
☆
आजी नाही अशा घरी,
झाडे उभी पानाविणा !
आजी नाही अशा घरी,
माळ खिन्न रानाविणा !
☆
नातू,नात असे नाते,
शेंडा भेटे जसा मुळा !
आंघोळीच्या बादलीला,
झरा सुचे झुळझुळा !!!!!
☆
चित्र साभार – श्री प्रमोद जोशी.
© श्री प्रमोद जोशी
देवगड.
9423513604
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈