सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– मातीत मुळे रुजताना…– ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
मूळास ओटीपोटी धरूनी
माती मजला उठ म्हणाली
फोडून माझे अस्तर वरचे
पानोपानी हळू फुट म्हणाली
☆
मी न सोडीन मूळास कधीही
तुझ्या कुवतीने वाढ म्हणाली
नभास पाहंन हरकून मीही
पिसार्यासम फुलत राहीली
☆
काही दिसानी सर्वांगावरती
इवले इवले कळे लागले
क्षणाक्षणांनी कणाकणांनी
ते ही हळूहळू वाढू लागले
☆
पहाटे अवचित जागी होता
गंधाने मी पुलकीत झाले
अय्या आपला चाफा फुलला
आनंदाने कुणी ओरडले
☆
भराभरा घरातील सगळे
माझ्या भवती झाले गोळा
फुलवती मी गंधवती मी
मीअनुभवला गंध सोहळा
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈