चित्रकाव्य
नूपूर आणि बेडी… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सुश्री वर्षा बालगोपाल ☆
(जे जे स्कूल ऑफ आर्टचा स्कल्प्चर गोल्डमेडॅलिस्ट श्री.सुहास जोशी, देवगड याने पाठवलेलं चित्र.)
☆
श्री आशिष बिवलकर
( १ )
कुणा पायात घुंगरू,
कुणा पायात शृंखला !
जीवनाच्या रंगमंचाचा,
वास्तववादी दाखला !
☆
मेहंदीने रंगले पाय कुणाचे,
कुणाचे रंगले ओघळत्या लाल रक्ताने !
रंगमंची कोणी दंग झाला,
स्वातंत्र्याचा यज्ञ मांडला देशभक्ताने !
☆
कोणी बेधुंद नाचून ऐकवीत होता,
छुमछुमणाऱ्या घुंगरांचा चाळ !
कोणी आनंदाने मिरवीत होता,
अंगावर अवघड बेड्यांची माळ!
☆
कुणा टाळयांचा कडकडाट,
होऊन मिळत होती दाद !
कुणा चाबकाने फटकारत,
देशभक्ती ठरवला गेला प्रमाद !
☆
कुणी नटराज होऊन,
करीत होता कलेचा उत्सव !
कुणी रुद्र रूप धारण करून,
स्वतंत्रतेसाठी मांडले रुद्र तांडव !
☆
कुणी नृत्याने शिंपडत होता,
आनंदात नृत्यकलेचे अमृतजल !
कोणी कठोर शिक्षा भोगून,
प्राशन करत होता हलाहल !
☆
नृत्य कलाकार त्याच्या परी थोर,
साकारला रंगदेवतेचा कलोत्सव!
स्वातंत्र्य सैनिकांना त्रिवार वंदन,
अनुभवला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव!
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆ ☆ ☆ ☆ ☆
सुश्री वर्षा बालगोपाल
(२)
एक पाय बंधनातील
एक पाय हा मुक्तीचा
दोन्ही मध्ये एकच सीमा
प्रश्न फक्त उंबर्याचा॥
☆
एक घर सांभाळते
एक घर साकारते
आजची स्त्री परंतु
दोन्ही भूमिका निभावते॥
☆
बंधनातही मुक्त जीवन
मुक्तीमधेही अनोखे बंधन
जणू हेच अध्यात्म सांगे कृतीतून
रुदन – स्फुरणाचे एकच स्पंदन॥
☆
बंधनाच्या श्रृंखला वा
कलेची ती मुक्त रुणझुण
नारी जीवन कसरतीचे
कधी बेडी कधी पैंजण॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈