सौ राधिका भांडारकर
चित्रकाव्य
– नाच गं घुमा… – ☆ सौ राधिका भांडारकर ☆
☆
कपाळावर लाल कुंकवाचा टिळा
गळ्यात काळ्या मण्यांचं डोरलं
हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा
हेच तुझं रूप समाजाने कोरलं…१
तुझ्या जीवनाच्या दोऱ्या
त्यांनी घेतल्या हातात
झालीस एक कठपुतळी
राहिलीस त्यांच्या धाकात …२
☆
नाच ग घुमा नाच ग घुमा
आखलं तुझं रिंगण
याच्या त्याच्या तालावर
नाचताना हरवलं भावांगण …३
☆
दार उघड बयो दार उघड
उभा होता उंबरठ्यात नवा विचार
उचल ती कातर कापून टाक दोर
होऊन जाऊ दे तुझ्या मुक्तीचा प्रचार ..४
☆
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈