श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– शह – काटशह…–
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
राजकारणाचे झाड,
सत्तेची झुलणारी फांदी !
भिरभिरणारी पाखरे,
बसून होती आनंदी !
आज या फांदीवर,
उद्या दुसऱ्या फांदीवर !
शह कटशह देत,
सत्तेचे चाले स्वयंवर !
कोणी न येथे नसे,
मित्र वा शत्रू कायम !
अचूक वेळ येई पर्यंत,
पाळतात सारे संयम !
कोण कोणाला नसे,
इथे स्पृश्य अस्पृश्य !
पापणी मिटताच,
पलटते पडद्यावर दृश्य !
विचारधारेचे घालतात लोणच,
डावपेचांनी घाले फोडणी !
त्यांच्या ताटाची करी चिंता,
कार्यकर्ते ठरतात अडाणी !
कार्यकर्ता भिडतो,
हातात मिरवीत झेंडे !
चामडीच नेत्यांची कडक,
शरमतात पाहुन गेंडे !
करेक्ट कार्यक्रम चाले,
कोण किती असो मोठा !
समीकरण जुळवत सारे,
शोधतात सत्तेच्या वाटा !
तुमच्या आमच्या पिंडावर,
पोसलेले सारेच कावळे !
टोच मारण्यास तत्पर,
पंचवार्षिक श्राद्धाचे सोहळे !
पाच वर्षात मतदार,
होतो एक दिवसाचा राजा !
पोकळ आश्वासनांचा,
नेते वाजवती रोज बँडबाजा !
खाण्याचे दात अन् दाखवण्याचे,
दात असतात वेगळे !
एका पेक्षा एक नग निघती सारे,
एकाच माळेचे मणी सगळे!
लोकशाहीचे कुरण,
चरण्यात सारे वळू होती दंग !
भूक संपता संपत नाही,
सतेचे उधळीत सारे रंग !
वेश्या जाणे कोणा समीप,
कोणाला लोटावे ते दुर !
मरे आत्मा,भूत सारी,
सत्तेसाठी बडवती उर !
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Kya baat hai 1no.