श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– फणसाचे झाड… – ☆ श्री आशिष बिवलकर / सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
१)
कितीही काटा छाटा,
जगण्याची हिम्मत नाही सुटली !
फळण्याच्या जिद्दीने,
फणसाला नवीन पालवी फुटली !
असला जरी काटेरी,
आतला गोडवा नाही सोडला !
कृतघ्नतेचे घाव साहून,
देण्याचाच स्वभाव जडला !
मधुर गरे दिले,
मधुर दिला सहवास !
घमघमाट फळाचा,
दरवळला गोड सुवास !
अचानक चालवावी,
क्रूरतेनने कसली कुठार !
घावावर घाव पडले,
ठेवला विश्वास केला ठार !
माणूस म्हणजे,
बेरकीच असतो !
स्वार्थापुढे कधीच,
कुणाचा तो नसतो !
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆ ☆ ☆ ☆ ☆
सुश्री नीलांबरी शिर्के
– फणसाचे झाड… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
२)
दानशूर कर्ण आणि वृक्ष
यात फरक सांगा काय ?
आयुष्यभर दान करूनही
फसवून दान मागितल जाय !
कर्णानेही कवचकुंडलाचे दान
रक्तबंबाळ होत दिलं काढून
शौर्याने रणांगणी लढत गेला
करत राहिला प्रतिकार लढून |
वृक्षही लढतोय अजूनही
जरी छाटलेत हात मान
मूळे धरतीत घट्ट अजून
तया सतत असे भान |
बुंधा पहाता झाडाचा
आपण जरा डोळे उघडून
दिसेल याची त्वचाही
नेलीये क्रूरपणाने सोलून |
देणे धर्म सोडला नाही
बुंध्यावरही फुटवे येई
एवढा मोठा फणस त्याच्या
दातृत्वाची जाणिव देई |
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈