सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “अस्तित्वाचा जागर…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
अथांग सागर भवताली
त्यात झोपडी इवली इवली
वाटेवरूनी चालत जावे
वाटे आत्ता याच पाऊली
☆
मन आवरू कशास अवखळ
मिठीत घ्यावे सागर वादळ
आधाराला असेल ना तो
सागरात एखादा कातळ
☆
पाय रोवूनी कातळावरी
विश्वासाने उभे रहावे
गाजेच्या संगीतासह अन
अंगावरती मुरवून घ्यावे
☆
संगीतासह गाजचैतन्य
मुरता देही.. देहच सागर
चैतन्यमय त्या लाटा ,पाणी,
अस्तिवाचा पुरता जागर
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈