सुश्री मंजुषा सुनीत मुळे
चित्रकाव्य
☆ “येणार तो कधीचा…” – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
येणार तो कधीचा
उन्मेष मम मनीचा
प्रतिबिंब आमचे ते
आनंद जीवनाचा !!
☆
येणार तोची म्हणूनी
फुलला जणू वसंत
स्वप्ने किती सजावी
नाही मना उसंत !!
☆
राजा असेल तो, की
राणीच गोजिरीशी
कोणी असो, आम्हाला
हुरहूर ती हवीशी !!
☆
इवलेच पाय आणि
इवलेच दोन हात
केव्हाची देती माझ्या
वेड्या मनास साथ !!
☆
गालावरी खळ्या त्या
आनंदमय नि डोळे
प्रतिमा मनीची माझ्या
माझ्यासवे ती बोले !!
☆
नाही तयाविना हो
या जीवनास अर्थ
येईल तोच तेव्हा
होऊ आम्ही कृतार्थ !!!!!
☆
कवयित्री : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈