सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “आयुष्ययात्रा…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
गोजिरवाणे बालपण इवले
त्याच्यापुढती बाल्य पहूडले
अगदी थोडे मोठे शैशव
कौमार्याच्या आधी ठाकले ।।
☆
तारूण्याचे रसरशीत पर्ण हे
पूर्ण वाढीने मोठे जाहले
प्रौढत्वाकडे झुकलेले जे
पिवळसरपण तयास आले ।।
☆
जरा वय वाढताच पुढती
सुवर्णाची झळाळी लाभली
इथवर जगण्याची शरिरी
कृतकृत्यता तया लाभली ।।
☆
म्हातारपण येता देहाला
काया सारी शुष्क जाहली
आणि शेवटी सुकता कुडी
इतिकर्तव्यता इथेच झाली ।।
☆
सारे इथेच डोळ्यासमोरी
पर्ण सांगते जीवनचक्रा
तुमचे, आमचे, त्यांचे, तिचे
अशीच असते आयुष्य यात्रा ।।
☆
जगण्याच्या साऱ्याच अवस्था
मनापासूनी जगून घ्याव्या
पुढती पुढती चालत असता
मागील अनुभव ध्यानी घ्यावा ।।
☆
वळून पाहता येते केवळ
आयुष्यी मागे फिरणे नाही
जी जी अवस्था जे देते ती
कडू-गोड शिदोरी सोबत घ्यावी ।।
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈