सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “स्वप्न असेही…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
एकेक साडी उलगडताना
स्वप्न विक्रीचे उमलून येते
तशीच साडी फेकली की
विस्कटून तयाच्या मागे पडते
☆
महिला साड्या पहातातच
अगदी निरखून आणि पारखून
नकार देत आणखी दाखवा
म्हणतात सारखे आवर्जून
☆
एकामागून एक घडी येते
नकार घेऊन मागे पडते
पडलेल्या साड्यांचा ढीग..
.. त्याची उंची वाढतच जाते
☆
ढिगाखाली आपसूकच
विक्रेत्याची अपेक्षा घुसमटते
एवढ्या साड्या पाहूनही जर
महिला तशीच उठून जाते
आणि विक्रेत्याच्या चेहऱ्यावरती
हताशाच केवळ उरते
☆
तरीही उमेदीने परत घड्या घालतो
कारण ती त्याला परत परत
उलगडून दाखवायची असते ……
…कुणातरी एकीला आवडेपर्यंत
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈