चित्रकाव्य
तूच गं ती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री सुहास सोहोनी ☆
☆
श्री आशिष बिवलकर
– तूच गं ती… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆
( १ )
कोल्ह्याला द्राक्ष लागतात आंबट,
तो ही पून्हा एकदा बघेल चाखून |
मादक सौंदर्य तुझं लावण्यवती ,
कोणीही न्याहाळेल श्वास रोखून |
☆
कामुक नजरेतून तूझ्या सुटती,
मदनाचे मनमोहक बाण |
घायाळ करतेस पामरांना,
एका अदेत होतात गतप्राण |
☆
विश्वमित्राची तपश्चर्या भंग करणारी,
मेनका तूच ग तीच असणार |
कलयुगात पुन्हा अवतरलीस,
सांग आता ग कोणाला तू डसणार |
☆
द्राक्षांचे घड मिरवतेस अंगावर,
उगाच कशाला वाढवतेस त्यांची गोडी |
एक एक द्राक्ष झाला मदिरेचा प्याला,
नकोस ग काढू खाणाऱ्यांची खोडी |
☆
चालण्यात ऐट तुझ्या,
साज तुझा रुबाबदार |
ऐन गुलाबी थंडीत,
वातावरण केलेस ऊबदार |
☆
महाग केलीस तू द्राक्ष,
गोष्ट खरी सोळा आणे |
अजून नको ठेऊ अंगावर,
होतील ग त्यांचे बेदाणे |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆☆☆☆☆
श्री सुहास सोहोनी
– तूच गं ती… – ☆ श्री सुहास सोहोनी ☆
( २ )
आधीच तुझ्या नजरेत केवढी
ठासून दारू भरलेली
त्यात आणखी द्राक्षांनीच तू
आपादमस्तक भारलेली ll
☆
तूच सांग बाई आता
किती नशा झेपवायची
आधीच केवढी तप्त भट्टी
आणखी किती तापवायची ??
☆
वाईन करण्यापूर्वी द्राक्षे
अशीच “पक्व”त असतील काय ?
दूध तापण्यापूर्वीच त्यावर
अशीच “डक्व”त असतील साय ??
☆
जे काही करीत असतील
करोत,आपलं काय जातं
समोर आहे खाण तोवर
भरून घेऊ आपलं खातं ll
☆
कवी : AK (काव्यानंद) मराठे
कुर्धे, पावस, रत्नागिरी
मो. 9405751698
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈