सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
नारी-दिन शुभेच्छा… सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
वर शक्तीचा तुला लाभलेला
संयम जन्मजात जडलेला
वर घरकाम संस्कार सांगे
उंबरठ्यात पाय अडलेला ॥
*
कर जणू सासरचा देतसे
सकलांसाठी अशी झटतसे
कर कामे तुझी श्रद्धा निष्ठेने
बदल्यात काही ना मागतसे॥
*
दर दिवशी रहाटगाडगे
युगानुयुगे गती घेत आहे
दर कसा बघ आता जगती
तुझा आपसूक वधारताहे॥
*
सर कामाची पुरुषांसोबत
आता सर्वत्र बरसत आहे
सर कर्तृत्वाचा तुझ्याच कंठी
अनमोल रत्नांनी रुळताहे॥
*
कळ कोणतीही नको सहाया
असे जगताची आज ही ईच्छा
कळ तुझ्या हाती पूर्ण जगाची
देती तुला नारी दिन शुभेच्छा॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈