सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
हातगुण… सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
हात टेकले प्रारब्धापुढे
पण संकटे मुळी जाईना
हात जोडता परमेश्वरा
आत्मबल मनीचे खचेना॥
*
हात पसरता कोणापुढे
मदत काडीचीही मिळेना
हात देता अडीला नडीला
कोडकौतूक ओघ थांबेना॥
*
हात सोडता संकटकाळी
कृतघ्नतेचा ठसा पुसेना
हात धरता घट्ट हातात
जन्मांतरीची गाठ सुटेना॥
*
हात फिरता डोईवरूनी
आत्मविश्वास उरात दाटे
हात मोडला ना बाधा तरी
ना पायाला बोचतील काटे॥
*
हात उचलणे नाही नीती
थोडा संयम असावा अंगी
हात चालवावा कार्यक्षेत्रात
सफलता मिळणार जंगी॥
*
हात गुण असती अनेक
त्यातीलच हे असती काही
हात लाभता मनास मग
कार्यगतीस थांबा नाही॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈