श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– या चिमण्यांनो परत फिरा… – ☆श्री आशिष बिवलकर ☆
☆
दार बंद करून,
चिऊताई बसली |
कळत नाही,
का बर ती रुसली |
*
ओसरीवर रोज नाचणारी,
आता ती दिसेनाशी झाली |
पूर्वापार माणसाळलेली,
माणसांपासून दूर गेली |
*
एक घास चिऊचा, एक काऊचा
भरवत पिढ्यानं पिढ्या वाढल्या |
चिऊताई तुझ्या गोष्टी ऐकत,
लहानाच्या मोठ्या झाल्या |
*
काळ बदलत गेला,
फ्लॅट संस्कृतीत कुठं राहिली ओसरी |
तुझेच घरटे हिरावलं आम्ही,
भूतदयेचे संस्कार सगळेच ते विसरी |
*
तुझा चिवचिवाट ऐकायला,
मनाची फुरसतच ती राहिली नाही |
चार दाणे तुला टाकायचे असतात,
सुचतच नाही आता मनाला काही |
*
असेल तिथे सुरक्षित रहा,
नामशेष मात्र नकोस होऊ |
चूकचूक करते पाल मनी,
चित्रात उरतील का हो चिऊ?
☆
© श्री आशिष बिवलकर
दि. 20 मार्च 2024
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈