सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
आकाशाशी जडले नाते… सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
पद न वाजवता गुपचूप येऊन का
नभ सख्याने ठरवले डोळे झाकायचे?
पद गात होती धरा सखी तन्मयतेने
भाळला आणि विसरला जे करायचे॥
*
लहर आली त्याला ठरवले होते जणू
खोडी काढून तिची थोडे उचकवायचे
लहर प्रितीची आली, पहातच राहिले
मुग्ध होऊन विसरले भान जगताचे॥
*
कर घेतले करात नकळत नभाने
शपथेने म्हणे जन्मांतरी ना सोडायचे
कर माझ्याशी लग्न वदे धरा प्रेमे मग
आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈