श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– ते जात्यात… तू सुपात… – ☆श्री आशिष बिवलकर ☆
☆
माणूसच कापतो माणसाचा गळा |
निरापराधांचे जीव गेले,
अन सामान्य माणूसच
नेहेमी सोसतोय झळा |
*
मुर्दाड व्यवस्थेच्या दलालांना,
कुठे पडली सामान्यांची तमा |
टक्के वारी, हप्ते वसुली,
निर्लज्ज करत बसलेत जमा |
*
पैशासाठी बायका मुलांनाही,
बाजारात नेऊन विकतील |
देव देश धर्म सारच काही ,
हाती लागेल ती फुंकतील |
*
राजमान्य भ्रष्टाचाऱ्यांना,
ना कुणाची भीती आहे |
मिल-बाटके सब खायेंगे ,
हीच त्यांची नीती आहे |
*
निरापराध माणसं मेली,
काय दोष त्यांच्या कुटुंबाचा |
दुर्घटनेच्या नावाखाली,
घडा लपवला जाईल पापांचा |
*
बंद डोळे – बंद कान करून,
सामान्य माणसा जगत रहा |
आज ते जात्यात, तू सुपात,
खेळ असाच पहात रहा |
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈