चित्रकाव्य
भाव वात्सल्याचा …
श्री प्रमोद जोशी ☆
☆
तिच्या डोक्यावर वीट,
झोळीमध्ये पांडुरंग!
त्याच्या नैवैद्याकारणे,
आई श्रमामधे दंग!
☆
तिच्या येरझाऱ्यामधे,
चाले पंढरीची वारी!
तिचे बाळाशी अद्वैत,
तिला नको मुक्ती चारी!
☆
तुळशीच्या जागी वीट,
आणि वहातुक दिंडी!
झोळीमधे पहा मूर्ती,
दारिद्र्यात राजबिंडी!
☆
गंधफुलांजागी हिच्या,
नशिबात विटा,वाळू!
झोळी झालेली पाळणा,
झोक्यावीण झोपे बाळू!
☆
दारिद्र्यात मातृत्वाला,
येते वेगळी चमक !
रडण्यावाचुनी बघे,
कुतुहल टकमक!
☆
तिची अद्भूत चिकाटी,
त्यांचे बाल्य समंजस!
बघा,सजण्यावाचून,
किती दृश्य हे लोभस!
☆
उन्हालाही स्वतेजाचा,
येतो मनोमनी रग!
त्याच्या इशाऱ्यावरुन,
येते झुळुकीला जाग!
☆
भाव वात्सल्याचा कधी,
कसा असेल गरीब?
दशदिशा वणव्याच्या,
तिचे ऊर चिंबचिंब!
☆
चित्र – अनामिक
© श्री प्रमोद जोशी
देवगड.
9423513604
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈