सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆ जायचेच जर न येण्यासाठी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के☆
☆
पुन्हा परत ना इथे यायचे
ठरवूनच ती निघून गेली
ती येण्याची वाट परंतू
इथे वाट पहात थांबली
*
त्या वाटेवर तिच्याचसाठी
मऊ रेशमी हिरवाई आली
अन् वाटेच्या अगदी मध्ये
झाड उभे विश्रांतीसाठी
*
येणार जर नव्हती तु तर
वाट कशाला आखीव मागे
पाहणारा गुंततो आपसूक
आठवणींचे उलगडून धागे
*
जायचेच जर न येण्यासाठी
काहीही ठेवावे ना पाठी
खाणाखुणा नष्ट कराव्या
हवे ते जपती काळीजकाठी
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈