श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य # 1
– कारगिल विजय-दिन… – ☆श्री आशिष बिवलकर ☆
☆
उतुंग आमची उत्तर सीमा,
कारगील तिथला मानबिंदू !
वाईट नजर शत्रूची त्यास,
शीर शत्रूचे तिथेच छेदू !
*
भारत मातेच्या मुकुटासाठी,
कारगिलवर पाकचा हल्ला !
रणशिंग फुंकले शूरविरांनी ,
दुम दुमला एकच तो कल्ला !
*
डोळ्यात तेल घालून जवानांनी,
सीमेवर दिवसरात्र घातली गस्त!
बिशाद केली त्या पाकड्यांनी,
केले तिथेच त्यांना उध्वस्त !
*
इंच इंच भूमीसाठी,
उंच उंचावर जवान लढले !
मातृभूमीच्या रक्षणासाठी,
हसत हसत धारातीर्थ पडले !
*
रक्त सांडले जवानांनी,
कारगिल भूमी केली पावन !
स्मरण आज विजय दिनाचे,
देशवासी करती वीरांना नमन !
*
जय हिंद
☆
चित्रकाव्य # 2
– स्थितप्रज्ञ तो एकमेव… – ☆श्री आशिष बिवलकर ☆
☆
संकटातही न डगमगता,
दिनक्रम राही ज्याचा ठाम |
कोणी वंदावे कोणी निंदावे,
स्थितप्रज्ञ तो एकमेव तळीराम |
*
कोणतेही असो संकट,
तो दिनक्रम मोडत नाही |
प्रयत्नांची पराकाष्ठा करून,
साथ तिची सोडत नाही |
*
सुखाचा असो वा दुःखाचा क्षण,
तिच्या प्रेमावरून नाही तो ढळत |
तिला सोडून जगात दुसरीकडे,
लक्ष त्याचे कधीच नाही ते वळत |
*
व्यसनमुक्तीचे संदेश गप्पा,
त्याच्या लेखणी ठरतात व्यर्थ |
एक एक प्याला रिचवत,
आला दिवस लावतो सार्थ |
*
एकच प्याला मधील सुधाकर,
त्याच्यासाठी आदराचे स्थान |
आपल्याच मस्तीत जगायचे,
कशाला बाळगावे जगाचे भान |
*
दि 04 ऑगस्ट 2024
☆
चित्रकाव्य # 3
– लाडकी बहीण… – ☆श्री आशिष बिवलकर ☆
☆
पंधराशे येती | आता खटाखट |
चला पटापट | बहिणींनो ||१||
*
दिवाळखोरीला | एक नवी वाट |
तिजोरीला चाट | लावुनिया ||२||
*
अक्कल धावते | आता घोड्यापुढे |
हातबट्टा पाढे | घोकूनिया ||३||
*
करदात्या तुझी | चालतसे लूट |
सत्ता ही बेछूट | भोगायसी ||४||
*
आंधळं दळत | कुत्र पीठ खातं |
असंच घडतं | कलयुगी ||५||
*
फुकट मिळते | नसते किंमत |
कशी ही हिम्मत | निर्णयाची ||६||
*
लाडकी बहीण | राखा तिची लाज |
नको तिला साज | बिब्बा म्हणे ||७||
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈