श्री रवींद्र सोनावणी
चित्रकाव्य
☆ आला पाऊस पाऊस…
☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
आला पाऊस पाऊस, सारे भिजले पाण्यात
आणि अंकूरले बीज, ओल्या मातीच्या मनात
☆
सुखे भिजे माळरान, सोडी निःश्वास कातळ
अंबराच्या डोळ्यांतले, भिजे ढगांचे काजळ
☆
आला पावसाळा, झाली सैरभैर वावटळ
माती ग्रीष्मातली पिते, थेंब टपोरे नितळ
☆
टपटपले अमृत, कुठे कोरड्या चोचीत
थेंब मोतीयांचे झाले, पानाफुलांच्या ओठांत
☆
ग्रिष्म भोगल्या माणसा, नको पाणी पाणी करू
आली मृगाची पालखी, झाला घंटानाद सुरू
☆
ग्रिष्म वनवासी झाला, आता पुरे नऊ मास
आसुसल्या धरणीची, आता उजवेल कूस
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈