सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
☆
( १ )
इवल्या इवल्या पोरी
निष्पाप निरागस
आपल्या बाबांच्या
वयाच्या पुरूषाला
काका म्हणणाऱ्या
मोठ्या मुलांना दादा
दादा म्हणून बोलणाऱ्या ….
*
त्यांना कळतच नाही
याच दादा काकांमध्ये
वावरत असतो नीचपणा
हलकट पाशवी वृत्ती
त्यांना तुमच्यात दिसतं
तुमचं मुलगी असणं …..
*
त्यांना ओळखताही येत नाही
किंवा विशेषण नसत त्यांना
तुमच्या निरागसतेला
सावध करण्यासाठी
ते संभावितपणे वावरतात
समाजात सहजपणे
अन मोका मिळताच
चुरगळतात निष्पाप कळ्या ……
*
कशा ठेवायच्या लेकीबाळ्या
जरा मोठ्यांना काही
सांगता तरी येतं ,
पण तरीही घरातली पोर
बाहेर गेली की मन
कावरंबावरं होतंच होतं ….
*
आल्यावरही लक्ष जातंच
ती गप्प आहे का ?
तिला कोणी छेडलं तर नसेल
अशा नाही नाही त्या विचाराने…
कवयित्री : नीलांबरी शिर्के
( २ )
कसे कळावे जनसमुदायी
कोण सज्जन आणि संत
भय वाटते सततच आता
अस्वस्थतेला नाही अंत
*
निरागस कळ्या घराघरातील
वावरती घरीदारी शाळेत
सुरक्षित त्या नाहीत आता
धाकधुक अन वाटतसे खंत
*
अबोध अजाण मूक कळ्या
चुरगळल्या जाती वाटे मना
कसा ओळखू हरामजादा
मती गुंग अन काही कळेना
*
असेल ज्याच्या मनात पाप
वाटे तयाला फुटावे शिंग
कुकर्म त्याच्या मनात येता
आपसूक सडावे त्याचे लिंग ….
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के