सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
– कानवसा – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
☆
विसावली एक पक्षिणी
झाडाच्या एका फांदीवर
काय चालले तिच्या मनांत
कुठे असावे तिचे कोटर..?
☆
कावरे बावरे चित्त तिचे
नजर बावरी दूर दूरवर
वाट पहात असावी ती
पिले उडाली तरी कुठवर..?
☆
बसली आहे तरु शलाकेवर
भवतीच्या निसर्ग परिसरात
परी काहूर माजे मनी तिच्या
काय चाले कोवळ्या अंतरात..?
☆
शुष्क कोरडेपणात मोहवी
हरित पालवीची नक्षी
कुणी पहात होता का तिज
तिच्या एकांताचा साक्षी..?
☆
येतील कधी पिले परतूनी
आशा डोकावी नयनांत
तयां संगे मग घेईल फिरूनी
मोदीत झेप उंच गगनांत..!
☆
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈