श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – हो सिद्ध द्रौपदी…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

हो सिद्ध द्रौपदी

तूच तूझ्या रक्षणासी |

कौरव तेव्हाही होते,

आजही आहेत लज्जा भक्षणासी |

*

तेव्हा तो एक होता कृष्ण,

तुझ्या चिंधीचे ऋण फेडायला |

आता कोणी येणार नाही,

तुला संकटातून बाहेर काढायला |

*

तेव्हा तुझ्याच लोकांनी,

पणाला तुला लावलं होतं |

आता पणाला न लावता,

तुझं सर्वस्व लुटलं जातं |

*

तेव्हा तुझे मोकळे केस,

आठवण देई झाल्या अपमानाची |

आता रोजच तुझी विटंबना,

नाही कोणास तमा तुझ्या सूडाची |

*

तेव्हा एक नव्हे पाच महारथी,

तुझा शब्दनशब्द झेलायला |

आता सगळेच झालेत षंढ,

कोणी ना येणार अश्रू पुसायला |

*

तेव्हा अग्नीतूनच प्रकट झालीस,

ओळख तुझी याज्ञसेनी |

आता रोजच तुझी चिता रचतात,

घटना म्हणून पडतेय पचनी |

*

षंढ झालंय शासन आता,

षंढ झालीय सारी व्यवस्था |

द्रौपदी गं तुझ्या भाळी,

लाचार हतबल केवळ अनास्था |

*

महापातकांचा नाश होतो,

पंचकन्येत तुझेच नाव स्मरतात |

जाण न राहिली तुझ्या माहात्म्याची,

आजच्या द्रौपदीला रोजच जाळतात |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments