सुश्री अपर्णा परांजपे
चित्रकाव्य
विश्वनियंता… ☆ सुश्री अपर्णा परांजपे
☆
शांत, प्रशांत निद्रा की विचारांचे मंथन हे ?
विश्वनियंत्या पुरुषाचे असीम सुंदर स्वरुप हे….
*
आकर्षणाचा केंद्रबिंदू हा महाविष्णु पहुडला जरा
नेत्राला दिसताक्षणी हा माया कोलाहल विरला….
*
आदीशक्ती महालक्ष्मी सावरि भार जगताचा.
बालक होऊन भक्त बोलती गजर आदीमायेचा ….
*
विचार आता कसला करता विश्वाच्या संहाराचा?
“माझे कार्य सृजनाचे, विचार करतो भक्तांचा”…
*
“दयानिधी” हे नाव सार्थकी करणे माझे वचन असे
प्रेमाचे हे कार्य अविरत निद्रा जरि मम भासतसे….
*
सर्जन माझी धरा तशी सागर, पर्वत ह्या सरिता
मनुष्य प्राणी दुखवित मजशी त्रस्त करितसे मम गात्रा…
*
भाविक भक्त जन माझे हे कृतार्थ करिती मम हृदया
चिंतन त्यांचे करून होतसे मोदमय विश्राम सख्या…
*
आत्मशक्तीचे भान ठेवुनी गातिल गीते मम भक्त
हीच शांतता, असिम निळाई मिळे बालका अनुरक्त…
*
एक वचन हे, हाच धर्म ही पालन त्याचे मी करतो
ह्या वचनांवर जो विसावे रक्षण त्याचे मी करतो….
*
स्वधर्म पालन करण्यासाठी उत्पत्ती चे हे काम
पूर्ण करोनी ये तू सखया त्यासाठी हा विश्राम …
*
आस असे ही भेटीची रे जशी तुला मजही तशी
बालक हा असा बघोनी आठवती मज चकोर शशी
*
जाणिव माझ्या या लीलांची ज्या सद्भक्ता होत असे
त्या साठी विश्राम समज हा वाट सतत मी पहात असे…
*
शांत प्रशांत निद्रा की विचारांचे मंथन हे ?
विश्वनियंत्या पुरुषाचे असीम सुंदर स्वरुप हे…
… विश्वनियंत्या पुरुषाचे असीम सुंदर स्वरुप हे…
🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈