सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
प्रेमकहाणी तरूवल्लींची सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
अंतर दोन तरुवल्लीमधले
कसे कमी झाले नाहीच कळले
अंतर प्रेमरंगी रंगून गेले
शशीबिंब तयाचे साक्षी जाहले ||
*
भेट घडू लागली नित्य नेमाने
ओढ सारखीच लागली अंतरी
भेट कोणतीही नकोच म्हणती
सहवासानेच येते तरतरी ||
*
आणाभाका झाल्या सवे राहण्याच्या
संगत सुखस्वप्ने रंगविण्याच्या
आणा कोणीतरी योग जुळवूनी
अक्षता डोई लगेच पाडण्याच्या ||
*
पिता प्रेमरसाचा मधुर प्याला
जग आपल्यामध्येच स्थिरावले
पिता ढगाने जाणले सर्व काही
दोनाचे चार हात मनी घेतले ||
*
कर कन्यादान अंतर बोलले
शुभस्य शिघ्रम निर्णय जाहले
कर दिला करात हर्षभराने
दोन प्रेमींचे मिलन घडविले ||
*
सुधाकराने केली ही कानपिळी
साथ निभावण्या वचन घेतले
सुधाकर आधाराचाच भासला
तरुवल्लिंचे असे बंध जुळले ||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈