सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
– लव्हाळी – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
☆
सारे नावाजती वृक्षतरुंना
कुणा नजरेस दिसे लव्हाळी ?
जोमाने वाढती जागोजागी
सारेच तुडविती पायदळी..
☆
कोपल्या निसर्गाचे तांडव
वादळ वारे पिसाटले
न साहूनी वृक्ष कोलमडले
लव्हाळीने मातीस घट्ट धरिले..
☆
नाही वाकली नाही मोडली
धैर्याने सामना दिला वादळाला
जाहले सैरभर उजाड सारे
कणखर लव्हाळी सांत्वनाला..
☆
वनस्पती लव्हाळी देई संदेश
जरी तिज नाकारूनी दुर्लक्षिली
असूनी इवली नगण्य जरी
चिवट जिद्दी नव्याने तरारली..!
☆
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈