सुश्री मंजुषा सुनीत मुळे
चित्रकाव्य
☆ “अगदी मनातले…” – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
खाली दगड असोत की वाळू असो
खत – पाणी असो नसो
मनापासून फुलणं मी विसरत नाही
मला कशानेच फरक पडत नाही…
*
रंग नाही रूप नाही
आकर्षित करणारा सुगंध नाही
आणि माझ्याकडे कुणी बघतंय की नाही
याने मला काहीच फरक पडत नाही…
*
बस् निसर्गाची कृपा आहे
किंचित प्राण माझ्यातही फुंकलेला आहे
हे माझ्यासाठी काही कमी नाही
मग फरक मला मुळी पडतच नाही…
*
इवलंसं माझं जग आहे
इवल्याशा डोळ्यांनी मला ते दिसतं आहे
मग मी कुणाला दिसो ना दिसो
मला मुळीच फरक पडत नाही…
*
आयुष्य म्हणजे मुठीतली वाळू
माणसाला कळतं पण वळत नाही
मी मात्र मजेत डोलतांनाही हे विसरत नाही
मग त्याने मला फरक काहीच पडत नाही…
*
मी आज आहे आणि उद्या नसणार आहे
हे त्रिकालाबाधित सत्य मी जाणलं आहे
पण म्हणून मी आजच कोमेजणार नाही
एकदा हे सत्य स्वीकारलं की…
मला ‘आज’ काहीच फरक पडत नाही…
☆
कवयित्री : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈