श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
बालपणीचा काळ सुखाचा.…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
बालपणीचा काळ सुखाचा,
हलक्या फुलक्या आठवणी |
मौज मजा धमाल मस्ती सारी,
सुखाची आकाशाला गवसणी |
*
आभाळ ही वाटालं ठेंगण तेव्हा,
सुंदर स्वप्नांची उंच उंच भरारी |
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद,
नव्हती कसलीच दुनियादारी |
*
काळ्या मातीत मुक्त बागडणे,
मोकळ्या मैदानावरचे खेळ |
माळरानाची बिनधास्त सफर,
मित्रमंडळींसाठी भरपूर वेळ |
*
कैऱ्या चिंच पेरू रानमेवा,
रोज चालायची मेजवानी |
पंचतारांकीतच होत जगणं,
ऐट सारी होती राजावानी |
*
अंगावर फाटका कपडा तरी,
नव्हती परिस्थितीची लाज |
मर्यादित साधन सामुगीत,
संस्कारांनी चढवला साज |
*
दुर्मिळ होत चाललय आता सर्व,
जीवघेण्या स्पर्धेत बालकांची उडी |
हिरावून घेतलं जातंय बालपण त्यांचं,
माफ कशी करेल तुम्हां आताची पिढी?
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈