चित्रकाव्य
२० मार्च : जागतिक चिमणी दिवस — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆
(या निमित्ताने वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या तीन कविता.)
☆☆☆☆
श्री आशिष बिवलकर
( १ )
दार बंद करून,
चिऊताई बसली |
कळत नाही,
का बर ती रुसली |
*
ओसरीवर रोज नाचणारी,
आता ती दिसेनाशी झाली |
पूर्वापार माणसाळलेली,
माणसांपासून दूर गेली |
*
एक घास चिऊचा, एक काऊचा
भरवत पिढ्यानपिढ्या वाढल्या |
चिऊताई तुझ्या गोष्टी ऐकत,
लहानाच्या मोठ्या झाल्या |
*
काळ बदलत गेला,
फ्लॅट संस्कृतीत कुठं राहिली ओसरी |
तुझेच घरटे हिरावले आम्ही,
भूतदयेचे संस्कार सगळेच ते विसरी |
*
तुझा चिवचिवाट ऐकायला,
मनाची फुरसतच ती राहिली नाही |
चार दाणे तुला टाकायचे असतात,
सुचतच नाही आता मनाला काही |
*
असेल तिथे सुरक्षित रहा,
नामशेष मात्र नकोस होऊ |
चूकचूक करते पाल मनी,
चित्रात तरी उरशील का गं चिऊ?
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆☆☆☆
श्री प्रमोद वामन वर्तक
(२)
निघे शुचिर्भूत होण्या
सात चिमण्यांची फौज,
लक्ष ठेवती त्यांच्यावर दोघी
रोखून आपली नजर तेज!
*
पंख चिमुकले बुडवून जलात
घेती आनंद स्नानाचा मनमुराद,
अंग शहारता गार पाण्याने
झटकून टाकती पाणी क्षणात!
*
उरे बोटावर मोजण्या इतकी
यांची संख्या बघा आजकाल,
येत्या ग्रीष्मात पाण्यावाचून
आपण त्यांचे टाळूया हाल!
आपण त्यांचे टाळूया हाल!
☆
© श्रीप्रमोद वामन वर्तक
मो 9892561086
☆☆☆☆
सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)
(३)
चिऊताई आली नाचत
माझ्या दारी अंगणात
या ग सा-या खेळायला
करू म्हणे गंमत जंमत
*
छान आहे इथे सारे
हिरवी हिरवी झाडे
पाना -पानातून लहरते
हवेहवेसे मंद वारे |
*
शांत सुंदर मंत्रांचा
नाद कानी निनादतो
जगतांना माणसाला
संदेश देऊया मैत्रीचा |
*
कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी.
मो. ९५९५५५७९०८/
☆
© शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈