सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– संत सोयराबाई –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
संत चोखा सहचर
संत बंका होता दीर
संत सोयराच्या घरी
विठ्ठल नामाचा गजर—
☆
चोखामेळ्याच्या कुटुंबी
पंढरीची नित्य वारी
विठ्ठल भरून उरला
मनमंदिरा गाभारी—
☆
विठूमाऊली भक्तीचा
वारसाच सासरचा
प्रथम दलित कवयित्री
मान आहे सोयराचा—
☆
समाजाला लागलेली
अंधश्रद्धेची खोल कीड
सोयराबाईस होती त्याची
मना आतूनच चीड—
☆
जातीभेद शिवाशीव
नको नको आचरणी
कर्मकांड यज्ञयाग
सोयरा सांगते भजनी—
☆
चराचरात विठ्ठल
नाही फक्त गाभाऱ्यात
ओतप्रोत भक्तीतून
आणि व्यक्त आचरणात—
☆
याच विषयाच्या केल्या
असंख्य अभंग रचना
अशा सोयराबाईला
मिळे भक्तिरस पान्हा—
☆
(देहीचा विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ म्हणती सर्व देहीचा विटाळ देहात जन्मला सोहळा तो झाला कवणाले – संत सोयराबाई)
या ताकदीने त्या काळात लिहिणारी संत सोयराबाई
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈