सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– भक्त पुंडलिक–
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
आईवडिलांची सेवा
त्यात गुंग पुंडलिक
त्याला जाणीवही नसे
वाट पाहतो श्रीरंग—–
☆
पुंडलिका, मी आलोय
त्याने मारताच हाक
न पाहता फेकली
त्याला बसावया विट—–
☆
चंद्रभागेचीया तटी
पुंडलिक वाळवंटी
वाट पाहे पांडुरंग
कर ठेवूनिया कटी—-
☆
पुंडलिक विसरला
उभे केले विठ्ठलाला
युगे युगे पांडुरंग
वाट पाहत राहिला—–
☆
पुंडलिका भेटीसाठी
देव तिष्ठत अजून
विटेवरी उभा विठू
वाट पाहे आसावून—–
☆
पुंडलिकाचे मंदिर
चंद्रभागा वाळवंटी
अजूनही उभा हरी
कर ठेवूनिया कटी—–
☆
भक्तिभावे ओथंबून
पुंडलिकाला भेटती
मग माऊलीची ओढ
विठू गाभाऱ्याशी नेती—–
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈