सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
–संत सावतामाळी– ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
माळ्याचा सावता
भक्त विठ्ठलाचा
विठू नाम घेता
मळा फुले त्याचा—–
कांद्यामुळ्यामधे
दिसे त्या विठाई
पाटातले पाणी
हरी गुण गाई—–
☆
माळ्याच्या फुलांना
वास अबिराचा
विठूच्या कपाळी
टिळा चंदनाचा—–
☆
भिजवी मळ्याला
भक्तिरस वाणी
सावताच्या मुखी
पांडुरंग गाणी—–
☆
सावत्याला भेटे
सखा पांडुरंग
गळामिठी देई
तया येऊन श्रीरंग—-
☆
जीव गुंते त्याचा
विठ्ठलाचे पायी
केवढी तयाला
लाभली पुण्याई—–
☆
रखुमाईवरा
भुलला सावता
पांडुरंग त्याचा
झाला माता पिता—–
☆
मातेचे रुधिर
बालकाशरीरी
तसा सावत्याच्या
शरीरी श्रीहरी——
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈