सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– झाडे लावा झाडे जगवा –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
झाडे लावा झाडे जगवा
संदेश फिरवीत गावोगावा
फिरते वाहन केविलवाणे
लादुन कितीतरी झाडांच्या शवा—
☆
दणकट शरिरे छोटे अवयव
रचून ठेविले योजकतेने
दोरखंड वर घट्ट आवळला
पडू नये या कल्पकतेने—
☆
विरोधाभास हा पाहून येते
डोळ्यामध्ये आपसूक पाणी
झाडे लावा झाडे जगवा
ओठी कोंडती जीवनगाणी —
☆
झाड कापले जाते तेव्हा
सावलीही हरवून जाते
फांद्यावरच्या घरट्यांशी
पक्षांचेही तुटते हृदय-नाते—
☆
फळाफुलांची तर ती होते
झाडागर्भीच भ्रुणहत्या
निर्घृणतेचे पाप मानवा
लिहिले जाते वहीत कोणत्या ?
☆
चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈