प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
चित्रकाव्य
☆ अनवाणी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
ती
अजूनही
चालतेय
त्याला
पतिपरमेश्वर मानून
त्याच्या पाठीमागे
अनवाणी पायांनी .
तिचं असं चालणं
अजूनही थांबलं नाहीए.
दगडधोंडे काट्याकुट्यांच्या आणि
फफूट्यांच्या वाटां
आता डांबरी होत चालल्या आहेत .
तिच्या अनवाणी पायांच्या
चिरत गेलेल्या टाचा
आता चकचकीत बनलेल्या डांबरी सडकेच्या
झळा सहन करत चालताहेत.
रस्त्यांनीही आपल्या बदलल्यात
रूढी परंपरा आणि चालीही…
पण ती मात्र
अजूनही परंपरेच्या
बंधनात
चालतच राहतेय
पुरुषप्रधान संस्कृतीमागे
अविरत.
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
९४२११२५३५७…
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈