सौ. अमृता देशपांडे
चित्रकाव्य
– हरित स्वप्न – ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
☆
उतरुनि पर्णसंभार सारा
व्यक्त झालो मुक्त मी
हा नसे की अंत माझा
ना कुणी संन्यस्त मी
☆
हे निसर्गी बांधलेपण
सर्वस्व धरेला वाहिले मी
ऋतुजेच्या उदरात पेरला
नवचैतन्याचा थेंब मी
☆
ढाळुन सारे पर्णपंख हे
आज मोकळा त्रयस्थ मी
ऋतुचक्राच्या पुढच्या पानी
हरित स्वप्न हे अंतर्यामी
☆
थेंबातुन त्या कोंब फुटुनिया
फिरून बहरे कृतज्ञस्थ मी
पर्णलेकरे लेवुन अंगी
लेकुरवाळा गृहस्थ मी.
☆
(चित्र साभार – सौ अमृता देशपांडे)
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈