सौ. मंजुषा सुनीत मुळे
चित्रकाव्य
– कविता स्मरण… – बा. भ. बोरकर – ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
बा. भ. बोरकर
☆
बोला कुणाकुणा हवे
फुलपाखरांचे थवे
जादूगार श्रावणाच्या
कर्णकुंडलीचे दिवे
☆
निळे जांभळे तांबडे
जर्द पिवळे हिरवे
काळे पांढरे राखेरी
भुरे पोपटी पारवे
☆
कोणी उन्हेरी चंदेरी
कोणी अंजिरी शेंदरी
मोरपिसापरी कोणी
वर्ख ल्यालेले भर्जरी
☆
कुणी मख्मली मल्मली
कुणी वर्गंडी वायली
किनखापी मुलायम
कुणी शीतल सायली
☆
कुणा अंगी वेलबुट्टी
चित्रचातुरी गोमटी
इंद्रधनूचेही वर्ण
होती पाहून हिंपुटी
☆
वर्णलाघवाचे थवे
जाती घेत हेलकावे
कधी थांबून पुसती
फुलापानांची आसवे
☆
कधी पिकलेल्या साळी
कधी साळकांची तळी
कधी लालगुंज रस्ता
जाती लंघून मंडळी
☆
त्यांच्या लावण्याने दुणा
येथे श्रावणाचा हर्ष
अशा मोसमी गोव्यात
खरेच या एकवर्ष
☆
पण धरायचा त्यांना
फक्त करावा बहाणा
सुखे बघत रहावा
सप्तरंगांचा तराणा
☆
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈