चित्रकाव्य
☆ सुमनांच्या बगिचामध्ये… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
त्याग करावा ना लागे काही
मोद हासरा भोवती राही
त्या गं कुसुमांच्या गावामध्ये
गंध रवी अस्ता जात नाही॥
☆
या सुमनांच्या बगिचामध्ये
रंगगंध गंमत जंमत
या तुम्हीही छान गावात
अनुभवा रंगत संगत॥
☆
सूर आळवीत कोणी राणी
गात बसते मधाळ गाणी
सूरही होती मोहित आणि
दंगूनी ऐकती गोड वाणी॥
☆
राग लोभ विकारांवरती
जय येथ सारे मिळवती
राग वनराणी जे छेडती
विहरणारे भान हरती॥
☆
जागा अशी मनात भरते
रोज रोज जावेसे वाटते
जा, गा, मना हर्षूनी तिथे तू
कानी कोण हे मला सांगते?
☆
शिरा-शिरातुन चैतन्याचे
आपसुक रुधिर वाहते
शिरा तुम्हीही गंध गुहेत
जिथे मनमोहिनी राहते॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈