श्री उदय गोपीनाथ पोवळे

🎞️ चित्रपटावर बोलू काही 🎞️

☆ Rocketry (हिंदी सिनेमा) – दिग्दर्शक – आऱ्. माधवन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

आज Rocketry हा हिंदी सिनेमा बघण्याचा योग आला. योगच म्हणावे लागेल कारण गेल्या आठवड्यापासून तो सिनेमा बघण्याचे मनात असले तरी वेळ काढता आला नाही. आज मात्र ठरवून रॉकेट्री सिनेमा बघितला.

डॉक्टर विक्रम साराभाईंनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, ज्यांच्या प्रचंड बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवला, ज्यांचा विक्षिप्तपणा सांभाळून घेतला, तेच डॉ. नंबी नारायणन ह्यांच्या आयुष्यावर चित्रित केलेला हा सिनेमा. आर. माधवन ह्या अभिनेत्याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे , आणि स्वतःच डॉ. नंबी नारायणन ह्यांची भूमिका केली आहे. हा सिनेमा बनवून, त्याने आपल्या भारत देशातील सगळ्या देशवासीयांसमोर एक असा काही नजराणा ठेवला आहे की तो आपण प्रत्येकाने स्वीकारून त्याचा नुसता आस्वाद न घेता, त्याचे स्मरण आपल्या आयुष्यात कायम राहील ह्याची खात्री बाळगली पाहिजे. 

डॉ एस. नंबी नारायणन (जन्म १२ डिसेंबर १९४१ ) हे रॉकेट वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता होते , ज्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) इथे काम केले आणि विकास रॉकेट इंजिनच्या विकासात योगदान दिले. २०१९ मध्ये त्यांना भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. भारताने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या PSLV मध्ये वापरलेल्या विकास इंजिनसाठी फ्रान्सकडून तंत्रज्ञान घेतलेल्या संघाचे त्यांनी नेतृत्व केले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO ) चे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते क्रायोजेनिक्स विभागाचे प्रभारी होते

अतिशय हुशार आणि प्रामाणिक असणाऱ्या डॉ नंबी नारायणन ह्यांना नासा ( National Aeronautics and Space Administration ) कडून खूप मोठ्या पगाराच्या नोकरीचा प्रस्ताव आला होता. पण फक्त नि फक्त त्यांचे देशप्रेम आणि आपल्या देशाचे नाव जगात अव्वल असावे ह्यासाठी त्यांनी तो प्रस्ताव ठोकरला. 

अशा प्रामाणिक आणि देशप्रेमी डॉ नंबी नारायणन ह्यांच्यावर १९९४ मध्ये हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना केरला सरकारकडून अटक करण्यात आली. एप्रिल १९९६ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने त्यांच्यावरील आरोप फेटाळले आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव केरळ सरकारला तपास सुरू ठेवण्यापासून रोखले. संपूर्ण दोन वर्षे ते आपल्या परिवारापासून लांब जेलमध्ये होते. दरम्यान ह्या सगळ्या प्रकाराचा त्यांच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला आणि  तिच्यावर मनोविकारतज्ञाकडून इलाज करावे लागले. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने, दीपक मिश्रा यांच्या खंडपीठामार्फत, डॉ नंबी नारायणन यांना ५०,००,००० रुपयांची भरपाई देऊन त्यांना निर्दोष ठरविले. तिरुअनंतपुरम येथील उपन्यायालयात केरला राज्याविरुद्ध दाखल केलेला खटला निकाली काढण्याच्या डिसेंबर २०१९  च्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, कोषागारातून १.३ कोटी रुपयांची अतिरिक्त भरपाई डॉ नंबी नारायणन ह्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली.

दिग्दर्शक आणि डॉ नंबी नारायणन ह्यांची भूमिका केलेले आर. माधवन ह्यांनी ह्या सिनेमात खूप काही दाखविले आहे. भारताची अवकाश संशोधन संस्थेमधील गुपितं पाकिस्तानला विकल्याच्या आरोपावरून डॉ नंबी नारायणन ह्या देशनिष्ठ शास्त्रज्ञाला केरला सरकारने तुरुंगवास कसा घडविला- डॉ नंबी नारायणन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने शारिरीक आणि मानसिक हालांना तोंड कसे दिले- एका न्यायी सीबीआय ऑफिसरमुळे तुरुंगातून ते बाहेर तर आले, पण काही राजकीय पक्ष्याच्या पाठिंब्यामुळे लोकांनी केलेला तीव्र धिक्कार कसे सोसत राहिले- संपूर्ण कुटुंबाची होणारी वाताहात घट्ट मनाने कसे सहन करत राहिले – हे सगळे यात दाखवले आहे.  तुरुंगातल्या छळाने डॉ नंबी नारायणन यांचे शरीर दुबळे झाले होते पण त्यांच्या बुद्धीची धार आणि संशोधनाची आस तशीच तेजस्वी होती.

डॉ नंबी नारायणन ह्यांची मे १९९६ मध्ये सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. तरीही २०१८ पर्यंत त्यांना अनेक वर्षे  कायदेशीर लढायांना सामोरे जावे लागले, कारण निर्दोष सुटल्यानंतर लगेचच केरळ सरकारने पुन्हा चौकशीचे आदेश दिले होते आणि त्यांना डॉ नंबी नारायण ह्यांनी आव्हान दिले होते आणि सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

आर. माधवनच्या ‘Rocketry’ सिनेमाने प्रेक्षकांना अभिमानाचे क्षण दिले आहेत, तसेच नकळत डोळ्यांतून पाणीही आणले आहे. पण मुख्यतः ह्या सिनेमांत डॉ नंबी नारायणन ह्यांच्या बुद्धिमत्तेचे दाखले दाखविले आहेत. एक मात्र नक्की, डॉ नंबी नारायणनसारखी असामान्य माणसे जेव्हा देशासाठी अशी  काही असामान्य कामे करतात तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्यांच्या असामान्य कामाची निदान थोडी फार जाणीव तरी असलीच  पाहिजे.

मी सर्वांनाच अतिशय नम्रपणे आवाहन करतो की हा सिनेमा नक्की बघावा, म्हणजे डॉ नंबी नारायणन ह्यांनी आपल्या देशासाठी काय काय केले आणि त्याबद्दल त्यांना काय काय सोसावे लागले ह्याची आपल्याला जाणीव होईल.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments