सुश्री तृप्ती कुलकर्णी

🎞️ चित्रपटावर बोलू काही 🎞️

☆ The Chorus ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

१९८२ सालची इराणची ‘द कोरस’ ही शॉर्ट फिल्म पाहण्यात आली. 

तर मंडळी ही फिल्म खूप जुनी असल्यानं ती बऱ्यापैकी ब्लर दिसते. पण यातले प्रमुख पात्र ‘आजोबा’ आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र काही काही प्रसंगात स्पष्ट दिसतात. आणि त्यावरून फिल्मच्या मूळ चित्रीकरणाचा दर्जा लक्षात येतो. 

ऐकू येत नाही म्हणून कानाला मशीन लावावं लागणारे आजोबा एका घोडागाडीच्या खाली येता येता वाचतात. नंतर मात्र ते न विसरता कानाला यंत्र लावतात आणि काही बाजारहाट करून घरी जातात. इथं एक गोष्ट मला फार आवडली की फिल्ममध्ये संवाद अत्यल्प आहेत. जवळ जवळ नाहीच असं म्हणलं तरी चालेल. पण आजोबांनी कानाला मशीन लावलं की आपल्याही आवाजाची तीव्रता वाढते आणि काढलं की कमी होते. हा साउंड इफेक्ट इथं फारच परिणामकारक वापरला आहे. कारण संवादाच्या अनेक जागा या ‘साउंडनं’ भरून काढल्या आहेत. किंबहुना आवाज हाच या फिल्मचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. या फिल्ममध्ये जाणवलं की व्यक्ती म्हणजे त्यांचे पोशाख, हुद्दा, त्यांचे चेहरे वगैरे गोष्टी इथं महत्त्वाच्या नाहीत पण ‘त्यांनी ऐकणं’ आणि त्यावर प्रतिक्रिया देणं जास्त महत्त्वाचं आहे.  

तर हे आजोबा घरी गेल्यानंतर जे घडतं ते अधिक महत्त्वाचं आहे. ते काय घडतं अगदी साधीशी घटना… आजोबा कानाचं मशीन काढतात आणि खाली घराचं दार लागलं जातं आणि शाळेतली नात आजोबांना हाक मारून दार उघडण्यासाठी विनंती करत राहते… पुढे काय होतं ते नक्की पाहा. अनेक घरांत घडणारी ही घटना पण जेव्हा ती सामाजिक आशयातून मांडली जाते तेव्हा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन तर बदलतोच, पण व्यवस्थेला एक चिमटाही काढला जातो.   

ऐकू न येणं, ऐकू येऊन न ऐकल्यासारखं करणं किंवा एखादा आवाज दाबण्यासाठी त्यापेक्षा दुसरा मोठा आवाज निर्माण करणं या सगळ्या गोष्टी आपण सगळे जाणून आहोत. व्यवस्था, मग ती कुठलीही असो, त्यात ते कसं पद्धतशीरपणे केलं जातो ते पाहतो, तर कधी कधी नकळत या व्यवस्थेचा भाग बनतो याची जाणीव आपल्याला यातून होते.

यातल्या रस्त्याचं खोदकाम हा भाग मोठ्या आवाजाचं प्रतिक म्हणून वापरलाय तो एकदम चपखल आहे. रस्ता म्हणजे वहिवाट, प्रथा, परंपरा याचं प्रतिक. त्याची दुरुस्ती करणं हे साधं सोपं काम नाही. त्याचा आवाज दडपणे अशक्य. पण यात एखादी लहानशी आर्त अशी हाक आपल्या आतल्या माणसापर्यंत पोहोचू शकते का…  त्या हाकेतली कोवळीक जाणवून आपण त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतो का… हे पाहणं महत्त्वाचं. कारण व्यवस्था सुधारताना, बदलताना आपण आतल्या अगदी अंतरातल्या लहान हाकेची, भविष्यातल्या स्वप्नांची साथ देणं महत्त्वाचं आहे. विशेषतः इराणसारख्या ठिकाणी, जिथं बरीच सामाजिक बंधन पाळावी लागतात… जिथं सहजासहजी व्यक्तीस्वातंत्र्य स्वीकारलं जात नाही तिथे हे घडणं अपेक्षित आहे. 

ते घडेल का… आणि कसं… असा एका लहानसाच प्रश्न…  पण उत्तरात मात्र बरेच मोठे बदल घडण्याची शक्यता असलेला… यामध्ये विचारला गेला आहे.  

परिचय

© सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments