सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ चार लघुतम कथा – (१) शर्यत… जिंकण्यापलीकडची (२) जखम… (३) कारण… (४) शहाणपण… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(१) शर्यत… जिंकण्यापलीकडची
शिट्टी वाजताच त्यांची धावण्याची शर्यत सुरू झाली. सगळीच मुलं शक्य तितक्या वेगाने पुढे जाण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. सगळ्यात पुढे असलेल्या मुलाने मध्येच सहजपणे मागे वळून पाहिलं … तर पळता पळता एक मुलगा पडला असल्याचं त्याला दिसलं. तो पुढे गेलेला मुलगा लगेच मागे फिरला… मागच्या सगळ्या मुलांना त्याने थांबवलं … आणि मग त्या शर्यतीतली सगळीच मुलं त्या पडलेल्या मुलाजवळ गेली. त्यांनी त्याला उठायला मदत केली. आणि पुन्हा ते सगळे स्पर्धक स्टार्टींग लाईनवर येऊन शांतपणे उभे राहिले. पुन्हा शिट्टी वाजली …
….. पण यावेळी मात्र त्या सगळ्या मुलांनी एकमेकांचे हात हातात घट्ट धरून पळायला सुरुवात केली होती… आणि ते पाहून सगळे उपस्थित अक्षरशः अवाक झाले होते … हे काहीतरी त्यांच्या विचारांच्या पार पलीकडचं होतं …..त्यांच्यापैकी कुणीच कधी न पाहिलेलं .. विचारही कधी न केलेलं असं काहीतरी …
… आणि सगळ्यांच्याच नकळत मैदानात टाळ्यांचा कडकडाट व्हायला लागला… चहू दिशांना तो घुमू लागला…. त्या मुलांना त्याचं कारण काही कळत नव्हतं … पण त्या सगळ्यांचेच चेहरे मात्र शर्यत जिंकल्यासारखे आनंदाने चमकत होते…
… ती पळण्याची शर्यत होती शारीरिक आणि मानसिकही अपंगत्व आलेल्या मुलांची…
☆☆☆☆☆
(२) जखम…
आज कामाला आल्यापासूनच कांता मरगळलेली दिसत होती. चेहरा सुजलेला … डोळे रात्रभर रडत राहिल्यासारखे सुजलेले… अजूनही ओलसर आणि लाल . तिला तशा अवस्थेत बघून जयश्रीने शेवटी न राहावून विचारलं … “ काय गं कांता, आज काय झालंय तुला ? तब्बेत बरी नाहीये का ? “ .. यावर कांताने नुसतीच नकारार्थी मान हलवली… “ आल्यापासून बघतेय, अगदी गप्प गप्प आहेस… कुठेतरी हरवल्यासारखी वाटते आहेस.. काय झालंय ? अगं काल तर किती खुशीत होतीस, नवी साडी नेसून आली होतीस .. येताजाता आरशात बघून स्वतःशीच हसत होतीस … किती छान गोड दिसत होतीस … आणि आज ही अशी ? काय झालंय बाळा ? “
कांताचे डोळे तिला न जुमानता भरून आले. तिला हुंदके आवरेनात. रडतरडतच कसंतरी म्हणाली …
“ ताई .. काल नेसलेली ती साडी ना .. ती नवऱ्याने त्याच्या त्या ठेवलेल्या बाईसाठी ….. “ बोलताबोलता ती अचानक जयश्रीच्या कुशीत शिरली … हमसून हमसून रडायला लागली. तिच्या भुंड्या हातावरचे वळ मात्र आता उघडे पडले होते… `
☆☆☆☆☆
(३) कारण…
ती छकुली .. गोड, गोंडस, हसती खेळती, सदैव फुलपाखरासारखी स्वच्छंदपणे घरभर बागडणारी ….
गेल्या आठ-दहा दिवसांपासून मात्र, बघताबघता फुलपाखराने पुन्हा कोशात जावं तसं काहीतरी वाटायला लागलं होतं तिच्याकडे पाहून ….
काही बोलत नव्हती .. सांगत नव्हती… नेहेमीसारखी हसत बागडत नव्हती आणि रडतही नव्हती. शून्यात बघत एकाच जागी कितीतरी वेळ नुसती बसून रहात होती फक्त.
काय झालं असावं हिला ? .. बाकी सगळं तर नेहेमीसारखंच होतं की .. मग तिच्या या अशा विचित्र वागण्याचं काय कारण असावं ते कुणाच्याच काही केल्या लक्षात येत नव्हतं .. डॉक्टरांकडे न्यावं का ?
पण ती काही आजारी वाटत नव्हती .. मग …आई-बाबा फार बेचैन झाले होते .. तिला सारखे काही न काही प्रश्न विचारत होते. पण प्रत्येक वेळी ती फक्त त्यांच्याकडे बघत होती… बधिरपणे.
— आठ-दहा दिवसांपूर्वी त्यांच्याकडे नेहेमी येणारा तिच्या वडलांचा मित्र चॉकलेट आणायला म्हणून तिला बाहेर घेऊन गेला होता … बस इतकंच ….
☆☆☆☆☆
(४) शहाणपण…
मॉर्निंग वॉकहून परत येतांना शीलाला आजही त्या आजी दिसल्या .. देवळासमोरच्या टपरीवर शांतपणे चहा घेत बसलेल्या. आज तिला तिचं कुतूहल शांत बसू देईना. आज रविवार असल्याने ती जरा निवांत होती.
चहा पिऊन झाल्यावर आजी त्या देवळात गेल्या तशी तीही पाठोपाठ गेली. आतल्या एका खांबाला टेकून बसत त्यांनी पिशवी उघडली .. त्यातून बराचसा कापूस बाहेर काढला, आणि शांतपणे वाती वळायला सुरुवात केली. मग जराशाने पिशवीतून प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्या काढल्या आणि वळून झालेल्या वाती मोजायला सुरुवात केली.
आता शीलाला तिची उत्सुकता शांत बसू देईना. ती आजींच्या शेजारी जाऊन बसली. त्यांनी एकदा शांत नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा आपलं काम सुरू केलं.
“ आजी, तुम्हाला एक विचारू का ? “
“ हो, विचारा की .. “ पुन्हा तसाच शांत आवाज.
“ तुम्ही रोज एवढ्या वाती का वळता ? आणि त्याचं पुढे काय करता ? “
“ एक भाला माणूस विकत घेतो त्या, आणि त्याचे पैसे देतो मला.. म्हणून तर रोज सकाळचा पहिला चहा निवांतपणे त्या टपरीवर घेता येतो ना मला .. “
“ अहो पण आजी, या वयात इतक्या पहाटे उठून थंडी-पावसाचं असं न चुकता बाहेर पडायचंच कशाला ना ..? “
या प्रश्नावर आजी जराशा गप्प झाल्या … पण मग मंदसं हसत म्हणाल्या ….
“ माझी सून आहे ना, ती अतिशय कर्तबगार, कर्तव्यदक्ष आणि स्वच्छतेची कमालीची भोक्ती आहे. तिला उठल्याउठल्या घर अगदी स्वच्छ, जागच्याजागी लागतं. अडगळीचा तर फारच तिटकारा आहे तिला … जराही सहन होत नाही .. आणि अडगळ पाहिली की दिवसभर चिडचिड होत राहते तिची. मग काय ? …. तिने ती अडगळ बाहेर फेकून देण्याआधी त्या अडगळीनेच आपणहून बाहेर जाणं केव्हाही शहाणपणाचंच .. नाही का ? “ …. आणि त्या शांत चेहेऱ्याने पुन्हा वाती वळायला लागल्या. … त्या शहाणपणाला मनोमन नमस्कार करत शीला उठून गेली.
☆☆☆☆☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈