श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ लंच टाईम… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
विश्वास जाधव बिल्डींगच्या लिफ्टमधून बाहेर पडला आणि शिळ वाजवत पार्किंगमधील गाडीच्या दिशेने गेला. पार्किंग लॉटमधून त्याने शिताफीने गाडी बाहेर काढली आणि गल्लीतून बाहेर पडून गाडी मुख्य रस्त्यावर आणली. आता अंधेरीचा स्टुडिओ त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजेच ग्रँड फिनाले. आज फारसे टेंशन नाही, कारण स्पर्धेचा निकाल जवळपास तयार होता. गेले आठ आठवडे स्पर्धा सुरु होती. एकंदर वीस हजार गायकांमधून वीस जण निवडले गेले. आणि या वीस जणांना आपल्या तिघांच्या हातात सोपवले गेले. माधुरी ही हिंदीतील गायिका या चॅनेलच्या प्रत्येक स्पर्धेला असे. ह्या चॅनेलची स्पर्धा आणि माधुरी हे ठरलेलेच होते. तिला फॅन्स पण फार होते. गेले पाच सिझन तिने गाजवले होते. विश्वासला पण तिच्या गाण्याबद्दल आदर होता. पण परिक्षक म्हणून सोबत बसल्यावर त्याच्या लक्षात आले की ती फार गर्विष्ठ आहे आणि या चॅनेलची लाडकी असल्याने जवळ जवळ हुकूमशहा आहे. दुसरा परिक्षक मंगेश हा पॉप म्युझिक मधील लोकप्रिय कलाकार. तो स्वभावाने बरा होता. पण उडत्या चालीची गाणी आणि पाश्चात्य गाणी त्याला जास्त आवडत. त्यामुळे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी त्याला आवडत नसत. त्यामुळे अशा गाण्यावर तो टिका करायचा हे विश्वासला आवडत नव्हते. तिसरा विश्वास. हा उदयोन्मुख संगीतकार. त्याचा पाया शास्त्रीय संगीताचा होता आणि गुरु चरणदास यांचेकडे तो शास्त्रीय गाणे शिकला होता आणि त्यांच्या गुरुकुलमध्ये अजूनही शिकत होता. विश्वासचे दोन मराठी आणि दोन हिंदी सिनेमे गाजले होते. आणि हिंदी अल्बम्सनी लोकप्रियता मिळविली होती. खरं म्हणजे हिंदीतील या प्रसिध्द चॅनेलने विश्वासला परिक्षक म्हणून निवडले तो प्रसंग विश्वासच्या डोळ्यासमोर आला. एका मराठी चॅनेलच्या वार्षिक कार्यक्रमाच्यावेळी विश्वास आमंत्रितांच्या खुर्चीत बसला होता. एवढ्यात एक पंचवीस वर्षाची मुलगी त्याच्या जवळ आली –
‘‘ आप विश्वासजी है ना ?’’
‘‘ हा, आप कौन ?’’
‘‘ मै, रचना.. एन चॅनल की तरफसे -’’
‘‘ क्या है ?’’
‘‘ मेरे सुपीरियर आपसे बात करना चाहते है, जरा बाहर आओगे ?’’
विश्वास बाहेर गेला. ती त्याला पार्किंग लॉटकडे घेऊन गेली. तिथे एका कारमध्ये तिचा सुपिरियर बसला होता.
‘‘ हाय मिस्टर विश्वास, मै शशांक .. फ्रॉम चॅनेल एन, हमारे चॅनेल का पाँचवा सुरसंगम एक महिनेके बाद शुरू होगा. हम चाहते है की, आप सुरसंगम प्रोग्रॅमके परीक्षकके रुप में काम करें ’’
‘‘ लेकिन मेरी कमिटमेंट…..’’
‘‘ कोई बात नहीं, ये प्रोग्रॅमकी शुटींग सप्ताहमें एक दिन होगी, सुबह १० से रात १० तक, बाकी के दिन आप फ्री है,’’
‘‘ मुझे सोचना पडेगा ’’
‘‘ कोई बात नही, हम फिर कल फोन करेंगे ’’
रात्रौ विश्वास पत्नी अनिता बरोबर बोलला. तिला पण एवढ्या मोठ्या चॅनेलने स्वतःहून संपर्क ठेवल्याबद्दल आश्चर्य वाटले. पण चांगले पैसे मिळत असतील तर ऑफर स्विकारायला हरकत नाही असे तिने मत व्यक्त केले. दुसर्या दिवशी एन चॅनेलवरुन पुन्हा रचनाचा फोन आला. चॅनेलने आठवड्याला लाख रुपये पेमेंट देण्याचा शब्द दिला. एक दिवस शुटींग, प्रत्येक एपिसोडचे कपडे वगैरे सर्व चॅनेल्सचे. विश्वासने विचार केला. प्रत्येक महिन्यात सहा लाख मिळत असतील आणि दोन महिने स्पर्धा चालली तर बारा लाख मिळतील. शिवाय या हिंदी चॅनेलमुळे भारतभर प्रसिध्दी. त्यामुळे हिंदी आणि प्रादेशिक सिनेमा मिळण्याची शक्यता मोठी. कार्यक्रमामुळे घराघरात आपण ओळखलो जातो हा मोठा फायदा. विश्वासला वाटले, राजापूर तालुक्यातील आपल्या गावातसुध्दा प्रत्येक घरी आपण दिसू. त्यामुळे आपले आईवडील, नातेवाईक, गाववाले किती खूष होतील हे त्याच्या डोळ्यासमोर आले आणि त्याने ही ऑफर स्वीकारली.
विचार करता करता त्याची गाडी स्टुडिओपाशी आली. त्याची गाडी पाहताच रखवालदार मनोहर धावला. त्याने फाटक उघडून त्याची गाडी आत घेतली. विश्वासने गाडी पार्किंग लॉटमध्ये लावताच मनोहरने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्याची बॅग बाहेर काढून तो विश्वास बरोबर सेटच्या दिशेने चालू लागला.
‘‘ मग विश्वासराव, फायनल किरण मारणार का ?’’
‘‘ बघू , अजून दोन परीक्षक आहेत ना?’’
रखवालदार मनोहर हळू आवाजात म्हणाला –
‘‘ तसं नव्हं, या आधी प्रत्येकवेळी धक्काच बसलाय, आम्ही अंदाज बांधतो एक आणि जिंकतो दुसराच काही करा विश्वासराव त्या किरणलाच नंबर द्या, केवढा लांबून आलाय ओ, उत्तराखंडवरुन आणि गातो काय एक नंबर. या मुंबईत त्याची लोक फॅन झालीत. गरीब आहे पोरगा. पहिल्यांदा आला तवा त्याच्या अंगावरची कापडं बघवत नव्हती. मी त्याला माझ्या पोराची कापडं आणून दिली. मग चॅनेलची कापडं आली सोडा. “
‘‘ बर, बघू.’’ असं म्हणून विश्वास सेटवरील आपल्या केबिनकडे गेला. त्याने पाहिले माधुरीच्या केबिनमधून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. म्हणजे माधुरी लवकरच सेटवर पोहोचली होती. मंगेशची केबिन बंद होती. म्हणजे तो अजून पोहोचला नव्हता. विश्वासने आपली केबिन उघडली आणि एसी चालू केला. टेबलावरील ग्लासातून पाणी प्याला आणि लॉकर उघडून गेल्या दोन महिन्यातील मार्कलिस्टवर त्याने नजर टाकली. मघाशी रखवालदार मनोहर बोलला ते त्याला पुन्हा आठवले. ‘‘ या आधी प्रत्येक स्पर्धेत धक्काच बसला ’’
‘ धक्का का बसला ?’ विश्वासच्या मनात आलं, धक्का बसू शकतो, कारण सर्वसामान्य लोकांचे मत आणि परिक्षकांचे मत एक होणे कठिण असते. प्रेक्षक मूळ गायकाचा आवाज हुबेहुब काढला की खुष होतात पण परिक्षकाला सुर, ताल, राग, आलापी सर्वच पहावे लागते… तो विषय झटकून विश्वासने आठ आठवड्यातील मार्कलिस्ट समोर आणली. पहिल्या चार आठवड्यात पंधरा जण कट झाले. आणि शेवटच्या महिन्यात राहिले पाच जण. जयंती, अरुण, केदार, तन्मय, निकिता. दोन मुलगे तीन मुली. त्याने स्वतः दिलेल्या मार्क्सचा अंदाज घेतला. केदार निःसंशय पहिला होता. त्याने पाहिले केदार ९० टक्केच्यावर होता. त्यानंतर जयंती, तन्मय, अरुण ही मंडळी पंच्याऐंशीच्या आसपास. आणि निकिता ऐंशीच्या खाली. त्याच्या डोळ्यासमोर केदार आला….. केदार पासवान… १४-१५ वर्षाचा, उत्तराखंडमधून आलेला. चेहर्यावरुन कळतं होतं तेथल्या आदिवासी भागातून आला असणार. मोडकी तोडकी हिंदी बोलत होता. कदाचित त्याची मातृभाषा वेगळी असेल. पहिल्या वीसात आला तेव्हा खूप घाबरलेला होता आणि सिनीअर परिक्षक माधुरी हिंदी आणि इंग्लिश मधून बोलून त्याला नर्व्हस करत होती. पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा.
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈